मराठमोळे अभिनेते किरण माने नेहमी चर्चेत असतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर किरण मानेंनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बिग बॉस मराठी’तून किरण माने घराघरांत पोहोचले. अभिनय क्षेत्र गाजविल्यानंतर आता किरण माने राजकारणात नशीब अजमावताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सोशल मीडियावर किरण मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान, किरण मानेंच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नुकतचे किरण माने व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भेट झाली. ‘मनोमिलन’ नाटकात दोघांनी एकत्र काम केले होते. मानेंनी या भेटीचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा- “महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम….” सई ताम्हणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिले, “किरण्या… हल्ली तू तलवारच उपसलीयस… मस्त लिहितोस. मी वाचत असतो तुझे लेख. पूर्वी लै शांत होतास लेका. मुंबैत घर घेतलंस ना? नाय तर एक फ्लायओव्हर बांध सातार्‍यापास्नं इथपर्यंत. किती दिवस सातारा-मुंबई प्रवास करीत फिरणारंयस?” अशोकमामा भेटल्या-भेटल्या सुरू झाले. “लै लै लै दिवसांनी भेटलो मामांना. तेही शिवाजी मंदिरमध्ये. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. ‘मनोमिलन’ नाटकाच्या वेळची आमची घट्ट मैत्री आजबी मामांच्या मनात आहे हे बघून लै भारी वाटलं. मज्जा आली. आज दिन बन गया.” मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहते या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘सिंधूताई माझी माई’ मालिकेत त्यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या वडिलांची अभिमान साठेंची साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. आता लवकरच त्यांचा पहिला चित्रपट ‘तेरवं’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.