Kushal Badrike : जून महिना उजाडल्यावर लहान मुलांना वेध लागतात शाळेचे…उन्हाळी सुट्ट्यानंतर जवळपास दीड-दोन महिन्यांनी शाळा पुन्हा एकदा सुरू होते. नवी इयत्ता, नवीन वर्ग, नवे शिक्षक या सगळ्याबद्दल लहान मुलांच्या मनात उत्सुकता असते. आपल्या मुलांना शाळेत जाताना पाहून ‘चला हवा येऊ द्या’ फेम लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणीत रमला आहे. दोन्ही मुलांचा शाळेत जातानाचा फोटो शेअर करत अभिनेत्याने खास पोस्ट लिहिली आहे.
शाळेतल्या आठवणी खूप खास असतात. आईच्या सूचना, शाळेचा पहिला दिवस आणि शाळेच्या खिडकीपासून सुरू झालेला प्रवास आता ट्रेनच्या खिडकीपर्यंत पोहोचलाय असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कुशलची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
कुशल बद्रिके सांगतो, “काही आठवणी विशिष्ट सुगंधाबरोबर जोडल्या गेलेल्या असतात. नवीन पावसाळी चपला, छत्री, पुस्तकं, दप्तर, वह्यांना त्यांचा-त्यांचा असा वेगळा सुगंध असतो. आजही हा वास मला शाळेच्या पहिल्या दिवसात घेऊन जातो. पहिल्या दिवशी शाळेला जाताना घरातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करून झाला की, आईची सूचनांची भलीमोठी यादी सुरू व्हायची. पावसात भिजू नकोस… छत्री हरवू नकोस… डबा उघडताना सांडवू नकोस… मस्ती करू नकोस, शाळा सुटली की सरळ घरी ये वगैरे वगैरे!”
“शाळेच्या गेटवर पोहोचलो की, प्रत्येक वर्षी तिच शाळा नवीन वाटायची. वर्गात सगळ्यात पहिलं जाऊन शेवटचा खिडकीजवळचा बेंच पकडण्याची माझी धडपड कायम असायची. शाळेतल्या “खिडकीपासून” सुरू झालेला प्रवास ट्रेनमधल्या “खिडकीपर्यंत” कधी येऊन पोहोचला मला कळलं सुद्धा नाही. हल्ली हल्ली, एखादी खानदानी परंपरा जपल्यासारखी, शाळेत जाताना आई देत असलेल्या सूचना आता माझी बायको माझ्या “दोन्ही” मुलांना सतत देत राहते. पावसात भिजू नका… छत्री हरवू नका…घरभर पसरलेल्या त्यांच्या नवीन चपला, नवीन दप्तरं, छत्र्यांचा वास घेत घेत घरातल्या “खिडकीतून” मी त्यांना बाय करत राहतो.” अशी सुंदर पोस्ट कुशलने शेअर केली आहे.
दरम्यान, कुशलच्या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “तुम्ही खूपच भारी लिहिता…”, “शाळा किती जिव्हाळ्याचा विषय”, “वाह सर तुमच्या शब्दांना तोड नाही”, “किती भारी वाटलं हे वाचून” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कुशल बद्रिकेच्या पोस्टवर दिल्या आहेत.