‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने बराच काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमातील श्रेया बुगडे, भाऊ कदम, भरत जाधव, नीलेश साबळे, कुशल बद्रिके यांनी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना खळखळवून हसवले. या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही हे कलाकार इतर कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. आता अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तो त्याच्या पत्नीला त्याने लिहिलेली कविता वाचून दाखवतो. तो त्याच्या पत्नीला म्हणतो, “एक कविता ऐक. अरे, माणूस माणूस जणू बरं का फणूस…”, त्यावर त्याची पत्नी म्हणते, “काय?”, त्यावर तो म्हणतो, “फणस असतं ना, ते यमक जुळवण्यासाठी फणूस, काव्य स्वातंत्र्य” पुढे तो म्हणतो, “अरे, माणूस माणूस जणू बरं का फणूस, वर काटेरी काटेरी आत मोतीयाचं कणूस”, त्याची पत्नी म्हणते, “कणूस?” त्यावर तो म्हणतो, कणीस असतं ना त्याला कणूस, काव्य स्वातंत्र्य” कुशल बद्रिकेची पत्नी म्हणते, “फणूस, कणूस. कोकणाला पंजाबी तडका दिला आहेस.” कुशल आनंदाने म्हणतो, “सही करतो खाली माझी.” त्यावर त्याची पत्नी कपाळावर हात मारताना दिसत आहे. थोड्या वेळाने ती म्हणते, “तू आहेस ना कुशल, फिनिक्स पक्षी आहेस, फिनिक्स पक्षी. म्हणजे राखेतूनसुद्धा तू काहीतरी नवीन जन्माला घालू शकतोस. एक काम करशील? या तुझ्या सगळ्या कविता आहेत, त्या जाळ आणि त्या राखेतून नवीन कामधंदा शोध. कविता करतोय. जाळ.” त्यानंतर कुशल काही कागद जाळताना दिसत आहे.

इन्स्टाग्राम

हा व्हिडीओ शेअर करताना कुशलने लिहिले, “आज महाराष्ट्राने एक कवी गमावला. कवीने संसारात अडकू नये. संसार म्हणजे तडजोड! म्हणजे स्वतःच्या अपेक्षांना ‘तडा’ आणि बायकोला उलट बोललात की, तिच्या पायातला ‘जोडा’. अरे संसार संसार, तडा-जोडा आहे केला. पुढे कवी मेला. बायको म्हणते हा काव्यात्मक न्याय आहे.”

हेही वाचा: ४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”

कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्याची मैत्रीण व सहकलाकार श्रेया बुगडेने कमेंट करीत कुशल बद्रिकेच्या पत्नीला म्हटले, “मी तुझे आभार कसे मानू?” आणि कुशल बद्रिकेला टॅग करीत लिहिले, “तू यास पात्र आहेस.” चाहत्यांनीदेखील यावर कमेंट्स केल्या आहेत. “आज आमच्यातला एक साथीदार गमावून खरच खूप दुःख वाटलं! जशा इंद्रायणीतून गाथा बाहेर आली, तशी त्या राखेतून दादाची कविता जन्म घेईल”, “शब्द जे होते वेचले, निरापराध होते खरे! भाव होता सच्चा, जणू कवीच्या मनाचा साचा, जळत नाही सारे, वाटले जरी तिला, कवी तो आहे मनाचा, जरी तुला वाटला बिनकामाचा!?”, “वहिनी, असं नका करू”, “तुमच्या त्या अद्भुत कवितांचा संग्रह आता कुठे उपलब्ध असेल”, असे म्हणत चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कुशल बद्रिके हा टीव्ही शोबरोबरच चित्रपटांतूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो.