महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके सध्या सोनी टिव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून कुशलनं १० वर्षं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अनेक चित्रपट, नाटक, मालिकादेखील त्याच्या नावावर आहेत. कुशल समाजमाध्यमांवर नेहमी सक्रिय असतो. कुशल अनेक कविता, शायरी, तर कधी कधी त्याच्या मनातल्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करीत असतो.

कुशलनं नुकतीच त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात तो काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतोय. या पोस्टला कॅप्शन देत कुशलनं लिहिलं, “सुरुवातीच्या काळात मी ट्रेनने भरपूर प्रवास केला, तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाइमटेबलसारखेच पाठ होते. ट्रेनमध्ये भजनात रमणारे दर्दी पाहिले, तशीच डब्यातली गुंडागर्दीही पाहिली. काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली, ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली.”

हेही वाचा… ३३ वर्षांपूर्वीच्या सुबोध भावेला पाहिलंत का?, अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाला, “१९९१ साली मी मंजिरीला…”

कुशलनं पुढे लिहिलं की, बकासुरासारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन, कुठेतरी जाऊन पुन्हा माणसं ओकते. असले भयंकर विचार तेव्हा मनात यायचे. आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मला ही ट्रेन एकदाची कायमची सुटावी, असं वाटत राहायचं. आता ट्रेन कायमची सुटली; पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्यासारखं झालंय. ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात, सहप्रवासी बदलत राहतात; ‘प्रवास’ मात्र कायम असतो! सुकून.”

कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “फोटोपेक्षा तुमची कॅप्शन १० पटींनी भारी उठून दिसते.” तर, दुसऱ्यानं लिहिलं, “भाऊ तू खूपच छान लिहितोस. तुझा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. खूप खूप शुभेच्छा तुझ्या येत्या प्रवासाला.”

हेही वाचा… “…ते माझं पहिल प्रेम आहे”, ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईकचं विधान; म्हणाली…

कुशल सध्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमध्ये आपलं विनोदी कौशल्य दाखवतोय. कुशलचा चाहतावर्ग मोठा असल्यानं सगळे त्याचा प्रत्येक शो बघतात. याचसंबंधित कुशलच्या एका चाहत्यानं या पोस्टवर त्याला कमेंट केली आणि लिहिलं, “मॅडनेस मचायेंगे या शोमधल्या शेवटच्या एपिसोडमध्ये तुम्ही हुमा कुरेशी मॅमच्या पाया पडत होता. यामागचं कारण कळू शकेल का? कारण- तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहात.”

या कमेंटला कुशल उत्तर देत म्हणाला, “मित्रा, तुमचा प्रश्न खरा वाटला म्हणून उत्तर देतो. त्या वेळेला, तिथे प्रश्न वयाचा नव्हता; भावनेचा होता. मला भरून आलं, तेव्हा एक बहीण म्हणून त्यांना मला मिठी मारावीशी वाटली हे त्यांच्या संस्कारातून आलंय आणि माझ्या या भावनेची त्यांना कदर करावीशी वाटली म्हणून मी पाया पडलो हे आपल्या संस्कारातून आलंय, आणि सांगू का? माणूस कसा प्रतिसाद देतो त्यापेक्षा तो व्यक्त कसा होतो हे महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. एक विनंती पुढच्या वेळी हे प्रश्न मला मेसेज करून विचारले, तर बरं होईल. कमेंट्समधे त्या पोस्टसंदर्भातल्या गोष्टी असाव्यात.”

हेही वाचा… करण जोहरची नक्कल करणाऱ्या केतन सिंगने मागितली माफी; म्हणाला, “माझ्या वागण्याने त्यांना त्रास…”

दरम्यान, कुशलच्या कामाबद्दल सागायचं झालं, तर आतापर्यंत कुशलनं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बुक’, ‘रावरंभ’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. कुशल आता सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमात आपली विनोदी कौशल्यं दाखवीत आहे. या कार्यक्रमात मराठमोळी हेमांगी कवी आणि फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरेदेखील आहे.