राजकारणी आणि अभिनेत्री स्मृती इराणी या एकेकाळी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नायिका होत्या. एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत त्या झळकल्या होत्या. ही मालिका २००० साली सुरू झाली होती, तर २००८ साली या मालिकेने निरोप घेतला. आठ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकतीच या मालिकेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच निर्माती एकता कपूरने या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली, तेव्हापासून या मालिकेबद्दल अनेक चर्चा होताना दिसल्या.

‘झूम’च्या वृत्तानुसार स्मृती इराणी यांनी ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’च्या दुसऱ्या पर्वासाठी एकता कपूरसह करार केला आहे असं म्हटलं जात आहे. रविवारी ८ जून रोजी स्मृती इराणी यांनी एकता कपूरची भेट घेतली होती. माध्यमांच्या वृत्तांनुसार स्मृती यांनी झेड प्लस सुरक्षिततेसह गेल्या महिन्यातच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यासह अमर उपाध्याय यांनीसुद्धा चित्रीकरणाला सुरुवात केल्याचं म्हटलं जात होतं. पण, अमर यांच्या टीमने हे वृत्त नाकारलं आहे.

स्मृती इराणी व अमर उपाध्याय एकता कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या घरी गेले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ची टीम दुसऱ्या पर्वासाठी १५० भागांचं नियोजन करत आहेत. यासह मालिकेचं दुसरं पर्व ओटीटीवर प्रसारित होणार असून यामध्ये स्मृती इराणी या मुख्य भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मालिकेच्या पहिल्या भागातील अनेक कलाकार दुसऱ्या भागातही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. स्मृती इराणी किंवा अमर उपाध्याय ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’च्या दुसऱ्या पर्वात झळकणार असल्याच्या वृत्ताबाबत बालाजी टेलिफिल्मस किंवा स्मृती इराणी यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी ‘क्या हादसा क्या हकिकत’, ‘थोडी सी जमीन थोडासा आसमान’, ‘विरुद्ध’, ‘एक थी नायिका’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’च्या पहिल्या पर्वामध्ये स्मृती इराणींनी तुलसी विराणी ही भूमिका साकारली होती. त्यावेळी त्यांची ही मालिका खूप प्रसिद्ध झाली होती. स्मृती इराणी यांनी २००३ साली राजकारणात प्रवेश केला होता.