Lagna Nantar Hoilach Prem New Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनीमध्ये हळुहळू मैत्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्न झाल्यापासून पार्थ हॉलमध्ये झोपत असतो मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात नंदिनी ओरडल्यामुळे काव्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पार्थला रुममध्ये राहण्यास सांगते. याशिवाय जीवा देखील दारू प्यायल्यामुळे नंदिनीची माफी मागतो.
नंदिनी, पार्थ आणि जीवा या तिघांनी आहे त्या परिस्थितीत हे नातं निभावण्याची मानसिक तयारी केलेली आहे. जीवा-नंदिनीमध्ये देखील हळुहळू चांगली मैत्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, काव्या काही केल्या लग्नाचा स्वीकार करण्यास तयार नसते. कारण, तिचं खरं प्रेम जीवावर असतं. काही करून आपलं प्रेम पुन्हा मिळवायचं असं काव्याने मनोमन ठरवलेलं असतं. अशातच मालिकेचा नवीन प्रोमो सध्या चर्चेत आला आहे.
काव्या अचानक येऊन जीवाच्या गाडीत बसते आणि त्याला म्हणते, “मस्त चाललाय तुझा आणि ताईचा संसार… डिनरला काय जाता…मध्यरात्रीपर्यंत बाहेर काय फिरता” काव्याचं हे बोलणं ऐकून जीवा प्रचंड संतापून म्हणतो, “जस्ट शट अप…मी त्यादिवशी दारू प्यायलो होतो आणि तुझ्या ताईने मला सोडवून आणलं होतं.”
काव्या पुढे जीवाला म्हणते, “एक लक्षात ठेव…मी माझा तुझ्यावर असलेला हक्क अजूनही सोडलेला नाहीये. तू माझा होतास आणि माझाच राहशील.” काव्याने जीवाला थेट धमकी दिल्यामुळे आता सख्ख्या मोठ्या बहिणीच्या संसारात काव्या अडथळा ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळेच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे.
“बहिणीच्या नवऱ्यावरचा हक्क सोडणार नाही ही गोष्ट सर्वात आधी जाऊन बहिणीला सांग”, “या सगळ्यात नंदिनी आणि पार्थ हे दोघे दुखावले जाणार आहेत”, “काव्याचं हे वागणं अतिशय चुकीचं आहे”, “हातचं सोडून पळत्याच्या मागे… असं सुरू आहे काव्याचं”, “काव्याची भूमिका किती निगेटिव्ह दाखवत आहेत..त्या तिघांनीही लग्नाचा स्वीकार केलाय पण ही ऐकतच नाहीये”, “पती पत्नी और वो असा प्रकार झालाय”, “सारखी धमकी देत असते ही काव्या” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा हा विशेष भाग येत्या २६ एप्रिलला प्रसारित करण्यात येणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित केली जाते.