Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ प्रेम या मालिकेत सध्या पार्थ-काव्याचं प्रेम बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. पार्थला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सगळे कुटुंबीय पार्थच्या खोलीत जातात. काही दिवसांपूर्वीच मानिनीने काव्याची रवानगी गेस्ट रूममध्ये केलेली असते. त्यामुळे ती थोडी घाबरत-घाबरत पार्थला भेटायला येते.

काव्या खोलीत राहत नाहीये हे पाहून रम्या पार्थजवळ राहण्याचे बहाणे शोधू लागते. पण, मानिनी तिचा डाव मोडून काढते आणि आता इथून पुढे मी माझ्या लेकाची काळजी घेईल असं सर्वांना सांगते. काव्याला पार्थच्या खोलीकडे आलेलं पाहताच विक्रम तिला प्रेमाने आतमध्ये बोलावतात. तसेच काव्याचं भरभरून कौतुक करतात.

देशमुखांना आगीपासून धोका आहे पण, आमच्या घरच्या स्त्रिया नेहमीच नवऱ्याचं रक्षण करण्याकरता पुढे येतात. आधी नंदिनीने जीवाला वाचवलं आणि आता काव्याने पार्थसाठी खडतर व्रत केलं. सासरेबुवा आपलं कौतुक करत आहेत हे ऐकून काव्यालाही समाधान वाटतं. पण, तिला मानिनी आपल्याबद्दल काय विचार करत असेल याची भीती असते.

पार्थची विचारपूस केल्यावर काव्या पुन्हा एकदा अभ्यास करण्यासाठी गेस्ट रूममध्ये जायला निघते. पण, यावेळी मानिनी तिला अडवते आणि तू काही वेळ पार्थजवळ थांब असं सांगते. सासूबाईंचा हा निर्णय ऐकून काव्याला खूप छान वाटतं. पण, आता इतके दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण मालिकेत येणार आहे.

मानिनी पुन्हा एकदा काव्याला पार्थबरोबर राहण्याची परवानगी देणार आहे. मानिनी गेस्ट-रूममधून काव्याची बॅग घेते यावेळी तिला वाटतं सासूबाई आपल्याला घराबाहेर काढणार. यामुळे काव्या मानिनीला उद्देशून म्हणते, “मी नाही जाणार कुठेही…मी पार्थशिवाय राहू शकत नाही.”

मानिनी म्हणते, “मी माझी चूक सुधारतेय…तुला परत सोडतेय पार्थकडे…तुझा वनवास संपला” काव्याला आलेलं पाहून पार्थ खूपच खूश होतो. यावेळी काव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. यानंतर मानिनी दोघांची नजर काढत असल्याचं पाहायला मिळतं.

प्रेक्षक हा प्रोमो पाहून खूपच खूश झाले आहेत. “लवकर हा भाग टेलिकास्ट करा खूप वाट पाहिलीये या दिवसाची”, “फायनली मानिनीला समजलं बाबा एकदाचं”, “आता हे स्वप्न असू नये म्हणजे मिळवलं”, “अरे वा मस्त खूप छान काम केलंय काकूंनी!”, “वॉव किती सुंदर प्रोमो आहे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.