Lakhat Ek Aamcha Dada fame actress Sumedha Datar exit: ‘लाखात एक आमचा दादा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सूर्यादादा, डॅडी, तुळजा, तेजू, धनू, राजू, काजू, पुड्या, शालन, मालन, तात्या अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच डॅडी सूर्याची फसवणूक करीत असल्याचे सत्य त्यांची पत्नी शालनला समजले. घर, जमीन, शेती सूर्याची असून त्यावर डॅडींनी त्याची फसवणूक करत ताबा मिळवला आहे. सूर्याला याबद्दल काही माहित नाही. तो डॅडींचा आदर करतो. शालन सूर्याची आत्या आहे. तिने ते सत्य सूर्याला सांगण्याचे ठरवले. मात्र, त्याआधीच डॅडींना शालनला त्यांचे सत्य समजल्याची जाणीव झाली. शालनने हे सत्य सूर्याला सांगू नये यासाठी त्यांनी तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शालन तिच्या निर्णयावर ठाम राहिली. त्यानंतर डॅडींनी तिला उंचावरून ढकलून दिले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
सुमेधा दातार काय म्हणाली?
अशा प्रकारे शालनचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुमेधा दातारची एक्झिट झाली आहे. त्यांनी ‘लाखात एक आमचा दादा ‘सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेचे दिग्दर्शक किरण दळवी म्हणाले, “एखादा प्रोजेक्ट सुरू असताना तो मधेच कोणी सोडून जाऊ नये, अशी माझी कायम इच्छा असते. गोष्टीची गरज म्हणून तुम्हाला मालिकेतून जावं लागत आहे; पण वर्षभर तुम्ही आम्हाला जी मदत केली, त्याबद्दल खरंच धन्यवाद”.
सुमेधा दातार म्हणाली, “खूप छान वर्ष गेलं. शालनने मला खूप काही दिलं आहे”. पुढे त्यांनी झी मराठी, लाखात एक आमचा दादा मालिका, प्रॉडक्शन, तसेच सेटवरील कलाकार आणि क्रू मेंबर याचे आभार मानले.
पुढे सुमेधा दातार केक कापत असताना सहकलाकारांनी ‘अभी ना जाओ छोडकर’ हे गाणे म्हटल्याचे ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सुमेधा दातार यांनी लिहिले, “शालनच्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी साथ दिली, सहकार्य केलं, प्रेम, आपुलकी दिली त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. शालन कथेतून संपली असली तरी प्रेक्षकांच्या मनात ती कायम राहील. स्नेह आहेच. तो वृद्धिंगत व्हावा”.
हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांचे पात्र खूप छान होते. त्यांची आठवण येईल, अशा अनेकविध कमेंट्स केल्या आहेत. “खूप मस्त. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा”, “आत्या सूर्याला तुमची गरज होती. तुम्ही लवकर जायला नको होते. तुमचे पात्र छान होते”, “तुमची भूमिका मस्त होती. तुमची आठवण येईल”, “हा ट्विस्ट आवडला नाही. शालन-मालनशिवाय मजा नाही. आता मालन एकटी पडणार”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, आता डॅडींचे सत्य सूर्यासमोर कधी येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.