Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सिद्धू आणि भावनाची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दळवी कुटुंबीयांनी भावनाच्या भविष्यासाठी तर, गाडेपाटलांनी राजकीय उद्देशातून या लग्नाला परवानगी दिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिद्धू लग्नानंतर भावनासह आनंदीची जबाबदारी सुद्धा स्वीकारणार आहे.
सिद्धू-भावनाच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचं कथानक अत्यंत नाट्यमय वळणावर पोहोचलं आहे. भावना आणि सिद्धूच्या लग्नामुळे गावात आणि गाडे पाटलांच्या घरात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. २३ जून ते ३० जून असा आठवडाभर प्रेक्षकांना सिद्धू-भावनाचा भव्य लग्नसोहळा मालिकेत पाहायला मिळणार आहे.
भावना-सिद्धूच्या लग्नाला सुरुवातीला विरोध झाला असला तरी, पक्षाच्या दबावामुळे गाडेपाटलांना अखेर या लग्नासाठी संमती द्यावी लागते. सिद्धू म्हणजे गाडेपाटलांचा लाडका राजकुमार आणि त्याचं लग्नही तेव्हढ्याच थाटात होणार, यात काही शंका नाही. पण, दुसरीकडे सिद्धूचं आधी ज्या मुलीशी लग्न जमलेलं असतं ती पूर्वी एक मोठा डाव खेळणार आहे. सिद्धूच्या आजीशी हातमिळवणी करून पूर्वी या लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, तिचे सगळे प्रयत्न असफल होऊन अखेरीस भावनाच गाडेपाटलांची धाकटी सून होणार आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धूच्या लग्नाची वरात वाजत-गाजत निघाल्याचं पाहायला मिळणार आहे. पण, या सीनसाठी पडद्यामागे संपूर्ण युनिटची अफाट मेहनत लपलेली आहे. पावसाळ्यात हे शूटिंग पार पडल्यामुळे वेळोवेळी टीमला खूप मेहनत घ्यावी लागली होती. जसं शूटिंग सुरू व्हायचं, नेमकी तेव्हाच पावसाची संततधार सुरू व्हायची, त्यामुळे अनेकदा चित्रीकरण थांबवावं लागलं. परंतु, सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी मिळून जिद्दीने तब्बल १० तास या वरातीचं शूट केलं. प्रेक्षकांसमोर दृश्य जसं रंगतदार दिसतं, तसं ते पडद्यामागे घडवण्यासाठी संयम, तयारी आणि समन्वय लागतो.
लग्नाच्या जवळपास प्रत्येक सीनमध्ये एकाच वेळी २५ ते ३० कलाकार, बँड, घोडा, सजावट आणि इतर टेक्निकल गोष्टी हाताळणं हे युनिटसाठी खूप मोठं आव्हान ठरलं. हे लग्न म्हणजे नात्यांमधील गुंतागुंत, राजकीय दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचा संगम असून, भावना-सिद्धूच्या लग्नानंतर ‘लक्ष्मी निवास’ मालिका पुढे काय वळण घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.