Zee Marathi Lakshmi Niwas : जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. हा पाहुणा नेमका कोण असणार याची सगळ्यांनाच आतुरता होती. अखेर जयंत-जान्हवीच्या घरी सशाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. जान्हवीने या सशाचं नाव बबुच्का असं ठेवलं आहे.
सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागून हसत-खेळत आयुष्य जगायचं असा जान्हवीचा स्वभाव असतो. पण, जयंत मात्र अगदी विरुद्ध स्वभावाचा असतो. आपल्या बायकोने कोणाशी मैत्री केलेली देखील त्याला आवडत नाही. जानूबाबत तो प्रचंड पझेसिव्ह असतो आणि यामुळे जान्हवीला दिवसेंदिवस प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जयंत जान्हवीचा कॉलेजमधील जिवलग मित्र ‘मॅड’ ( विश्वा ) नेमका कोण आहे याचा शोध घेत होता. यानंतर भावना-सिद्धूच्या लग्नामुळे जयंतने मॅडचा शोध घेणं थांबवलं होतं. अशातच जयंत जान्हवीच्या घरात सशाचं आगमन होतं. जान्हवी सशाला पाहून खूपच आनंदी होते…आता ती दिवसरात्र या सशाची काळजी घेताना मालिकेत दिसणार आहे.
सशाला आराम करण्यासाठी खास बेड, त्याची काळजी घेण्यासाठी गाजर व अन्य वस्तू या सगळ्या गोष्टींकडे जान्हवीचं काटेकोरपणे लक्ष असतं. पण, जान्हवी आणि बबुच्का ( ससा ) यांचं बॉण्डिंग पाहून जयंतचा विकृत स्वभाव पुन्हा एकदा समोर येणार आहे.
जान्हवी सशाची ज्याप्रकारे काळजी घेतेय…या सगळ्या गोष्टी जयंतला पटत नसतात. “माझ्या बायकोच्या जवळ कोणीच जाऊ शकत नाही” असं जयंतचं म्हणणं असतं. जान्हवीच्या जवळ ज्या लोकांनी जाण्याचा प्रयत्न केलाय त्या सगळ्यांना जयंतने चांगलीच अद्दल घडवल्याचं मालिकेत यापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं आहे.
जान्हवीने यापूर्वी घरच्या वॉचमनला खीर दिल्यामुळे जयंतने त्याचाही जीव घेतला होता. त्यामुळे आता सशाच्या बाबतीत जयंत काय करणार? जयंतच्या मनातील विकृती जान्हवी वेळीच ओळखेल का? आता सशाला जयंतच्या तावडीतून कोण वाचवणार? या सगळ्याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होणार आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अरे हा जयंत देवमाणूस मालिकेतील डॉक्टरपेक्षा सायको आहे”, “आता बबुच्काचं काहीच खरं नाही”, “हा जयंत पुढे जाऊन स्वत:च्या मुलांशी पण असाच वागणारे का?”, “गेला बबुच्का बाराच्या भावात” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवरील महामालिका आहे. त्यामुळे ही सिरियल रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.