काही महिन्यांपूर्वी झी मराठीवर ‘लोकमान्य’ ही मालिका सुरू झाली. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री स्पृहा जोशी हिने लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. नुकतेच या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले. आता या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने गोपाळ गणेश आगरकर यांना एका पोस्टच्या माध्यमातून पत्र लिहिलं आहे.

अभिनेता अंबर गणपुले हा या मालिकेत गोपाळ गणेश आगरकर यांची भूमिका साकारत होता. नुकताच या मालिकेतील त्याचा शेवटचा भाग चित्रित करण्यात आला. लवकरच या मालिकेतून त्याची एक्झिट होणार आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्या भूमिकेनं त्याला काय दिलं हे त्यानं एका पोस्टमधून शेअर केलं. त्यानं या मालिकेदरम्यानचे त्याचे काही फोटो शेअर करत लिहिलं, ‘प्रिय, गोपाळ गणेश आगरकर; आपल्याला पत्र आलंय हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण- मला माहिती आहे तुम्हाला सवय नाहीये कोणी तुम्हाला पत्र लिहायची. आम्ही सगळेच तुम्हाला कुठेतरी विसरलो आहोत. पण, तुमचं कार्य किती मोठं आहे याची जाणीव लोकांना करून द्यायची संधी मला मिळाली हे मी माझं नशीबच समजतो.’

आणखी वाचा : काय सांगता! स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, जाणून घ्या काय आहे दोघांच्यात नातं?

पुढे तो लिहितोय, ‘अगदी लहान वयापासून दारिद्र्यात आयुष्य काढलं तुम्ही. शिक्षणाची एवढी आवड असल्यानं केवळ परिस्थितीअभावी तुम्ही शिक्षण मिळावं म्हणून कॉलेजसाठी कराडपासून पुण्यापर्यंत चालत गेलात. पुढे जाऊन तुम्ही लोकांना शिक्षण मिळावं यासाठी एवढं मोठं काम कराल याची कोणीच कल्पना केली नव्हती. समाजात पुढारलेपण यावं, जुन्या रूढी-परंपरा खोडून काढाव्यात यासाठी आयुष्यभर झटलात तुम्ही. आज आपल्या समाजात स्त्रियांना शिक्षण मिळतंय आणि त्या पुरुषांच्या बरोबरीनं उभ्या राहिल्यात. जातिभेद, वर्णभेद नष्ट होताना दिसतायत, हे पाहून तुम्हाला कुठेतरी आनंदच होत असणार. पण, अजून भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे आम्हाला. तुमच्याएवढे अजून आमचे विचार पुढारलेले नाहीत. काळानं घात केला म्हणून नाही तर तुम्ही अजून भरपूर कार्य केलं असतं याची कल्पना आहे मला… आणि त्याचा फायदाच झाला असता आम्हाला.. असो!’

शेवटी त्यानं लिहिलं, ‘गेले चार महिने तुमचं पात्र साकारताना तुम्ही काय काय भोगलं आहे? तुमचे काय विचार होते? याची पुसटशी कल्पना मला नक्कीच आली आहे आणि ती मला आयुष्यभर पुरणारी आहे. एक माणूस म्हणून या गोष्टी समृद्ध करणाऱ्या होत्या. तुम्ही असाल माझ्याबरोबर कुठेतरी… नेहमी… आणि शेवटी सुरेश भट यांच्या कवितेच्या चार ओळी तुमच्यासाठी- इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.’

हेही वाचा : स्पृहा जोशी व सायली संजीव एकमेकींना ‘ताई’ का म्हणतात? गुपित उघड करत अभिनेत्री म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून, त्यावर त्याच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीदेखील कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. तर अंबरच्या या पोस्टवर स्पृहा जोशीनं कमेंट करत लिहिलंय, ‘प्रेम आणि खूप प्रेम अंबर…’ आता त्याची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.