Star Pravah : सध्या ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. मालिकेतील कलाकारांचा सन्मान व्हावा, त्यांना प्रेक्षकांच्या प्रेमाची पोचपावती मिळावी याकरता दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यंदा ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याचं पाचवं वर्ष आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमात ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने एन्ट्री घेतली होती. सध्या माधुरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

यावर्षी पार पडणाऱ्या ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षित सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. अभिनेत्रीने खास मखमली सुंदर अशी साडी नेसून पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. यावेळी तिने गळ्यात मोत्याचा सुंदर असा नेकलेस घातला होता. ‘स्टार प्रवाह’ने आता अभिनेत्रीच्या एन्ट्रीचा अधिकृत प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

माधुरीने रंगमंचावर एन्ट्री घेताच कलाकार एकच जल्लोष करतात. धकधक गर्लला पाहिल्यावर सगळ्या मालिकांमधल्या नायिका आनंदी झाल्या होत्या. माधुरीला प्रत्यक्ष पाहून सोहळ्याला उपस्थित असणारा प्रत्येकजण आनंद व्यक्त करत होता. या कार्यक्रमात माधुरीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कलाकारांसह डान्स करून, त्यांना दाद देण्यासाठी अभिनेत्री शिट्टी देखील वाजवणार आहे.

मंचावर एन्ट्री घेताच माधुरी म्हणते, “गेल्या कित्येक दिवसांची माझी उत्सुकता संपतेय. मी आपल्या माणसांच्या, आपल्या सोहळ्यात येतेय. आता या कुटुंबाचा मी एक भाग आहे. हा सोहळा जगावेगळा आहे पण, तरीही मराठमोळा आहे. प्रेम, परिवार, पुरस्कार आणि यंदाचं पाचवं वर्ष… म्हणून मी आलेय. तुम्ही सुद्धा नक्की या.”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सोहळ्याला माधुरी दीक्षित तिच्या ‘पंचक’ सिनेमाच्या निमित्ताने आली होती. हा सिनेमा थिएटरनंतर आता ‘स्टार प्रवाह’वर प्रदर्शित होणार आहे. याबद्दल माधुरी सांगते, “मोठा आणि छोटा पडदा असं काही नसतं. मनोरंजन हे सगळ्या माध्यमातून होतं. मी तर, ओटीटीवर सुद्धा काम केलंय. मला करिअरमध्ये नेहमीच नवनवीन संधी मिळाल्या त्यामुळे यासाठी रोज मी देवाचे आभार मानते. त्यामुळे कोणत्याही माध्यमांवर काम करण्यास मी तयार आहे. सध्या मराठीमधल्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर माझा ‘पंचक’ सिनेमा टेलिव्हिजनवर रिलीज होतोय त्यावर माझं सगळं लक्ष आहे.”