Maharashtrachi Hasya Jatra Fame Arun Kadam Birthday Celebration : आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अरुण कदम. आजवर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये तसेच कॉमेडी शोजमध्ये काम केलेलं आहे. अरुण कदम यांना ‘लाडका दादूस’ अशी ओळख देखील मिळालेली आहे. घराघरांत त्यांचा चाहतावर्ग आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या दादूसने नुकताच ६० वा वाढदिवस साजरा केला. याचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अरुण कदम काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांसह कोकणात फिरायला गेले होते. आता अभिनेत्याने पत्नी, लेक, जावई अन् नातवासह ६० वा वाढदिवस साजरा केला आहे. २०२३ मध्ये अरुण कदम आजोबा झाले. त्यांच्या नातवाचं नाव आहे अथांग. अरुण कदम यांची लेक सुकन्या नेहमीच अथांगबरोबरचे गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सुकन्याने अरुण कदम यांचा वाढदिवस घरी कशाप्रकारे साजरा करण्यात आला याची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यावेळी सर्वप्रथम त्यांचं औक्षण करण्यात आलं. पुढे, लाडक्या दादूसने कुटुंबीयांसह ६० व्या वाढदिवसाचा केक कापला. त्यांच्या चिमुकल्या नातवाने यावेळी त्यांना खास गिफ्ट सुद्धा दिलं.
अरुण कदम यांना नातवाने घड्याळ गिफ्ट दिलं आहे. या घड्याळाच्या मागे ६० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा! असं कोरण्यात आलं आहे. लाडक्या नातवाने दिलेलं गिफ्ट पाहून अरुण कदम खूपच आनंदी झाले होते.
अरुण कदम यांच्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलाकारांनी सुद्धा खास पोस्ट शेअर केल्या होत्या. याशिवाय त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशन पोस्टवर सुद्धा चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘कॉमेडीची बुलेटट्रेन’पासून ते महाराष्ट्राची हास्यजत्रेपर्यंत…अरुण कदम यांनी कायम प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. याशिवाय मराठी सिनेमा, मालिका तसेच रंगभूमीवर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेची नोकरी सांभाळून त्यांनी हा कलेचा वारसा पुढे नेला म्हणूनच त्यांचा प्रवास अधिक प्रेरणादायी वाटतो.
