मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने सोशल मीडियावरुन समाजातील घडामोडींवर व्यक्त होताना दिसतात. अनेकदा किरण मानेंच्या पोस्ट चर्चेतही असतात. काही दिवसांपूर्वी किरण मानेंनी संत तुकारामांच्या पालखीबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. आता आषाढी वारीच्या निमित्ताने त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन संत तुकारामांची पालखीला चकाकी देणाऱ्या मुस्लीम बांधवाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

तुकोबारायांची पालखी सजवायचं काम लय जोशात सुरू हाय भावांनो. सगळ्या वारकर्‍यांचं मन मोहून टाकणारा चांदीचा रथ झळकायला लागलाय…चांदीची पालखी चमकायला लागलीय…हे सगळं काम केलंय पिंपरीचे आपले मुस्लीम बांधव कमर अत्तार यांनी!

देहूतल्या देऊळवाड्यात कमरभैय्यांसोबत इम्रान शेख, उमर अत्तार, जाफर खान, शेहनाज आलम, अतिम बागवान हे सगळेच बांधव तल्लीन होऊन पालखी सजवायचं काम करत आहेत. अब्दागिरी, गरुडटक्के झळकवलेत… तुकोबारायांच्या पादुकांना आणि त्यांच्या पूजेच्या साहित्याला या सेवेकर्‍यांनी आनलेलं तेज पाहून डोळे दिपायला लागलेत. “तुकोबारायांची सेवा करताना आमाला लै खुशी होते. गेल्या सहा वर्षापासून ही संधी आम्हाला मिळतेय, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो.” असं या कारागीरांचं म्हणणं हाय.

रथावर आलेली काळसर पुटं त्यांनी जशी रिठा, लिंबू, चिंच, पावडरनं काढून टाकली आणि शुभ्र, लख्ख झळाळी आणली…तशी लोकांची जातीभेदानं-धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं घासूनपुसून स्वच्छ करण्याचं साधन कुठलं आसंल, तर ते तुकोबारायांचे अभंग! ते वाचनार्‍या मानसाला बहकवन्याचा दम कुठल्या व्हॉट्स अप फॉरवर्डमध्ये नाय गड्याहो.

आजच्या नासलेल्या भवतालात, “भेदाभेद भ्रम अमंगळ” हा तुकोबा माऊलीचा संदेश करेक्ट आणि परफेक्ट कळलेल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला लै म्हंजी लैच अभिमान हाय!

हेही वाचा>> Video : माधुरी दीक्षितला ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, केदार शिंदे कमेंट करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण मानेंच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून घराघरात पोहोचलेले किरण माने ‘रावरंभा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात त्यांनी हकीम चाचा ही भूमिका साकारली आहे.