Swapnil Rajshekhar Keshavrao Bhosale Theatre Post : कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याच्या घटनेला आता जवळपास वर्ष झालं आहे. आगीच्या या घटनेमुळे केवळ कोल्हापूरच नव्हे, तर राज्यभरातील रंगकर्मी हळहळले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निधी मंजूर करून महापालिकेला नाट्यगृह पुन्हा उभारण्याचे काम देण्यात आले. मात्र, ते काम अजून झालं नसल्याची पोस्ट मराठी अभिनेत्यानं शेअर केली आहे.

८ ऑगस्ट २०२४ रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती. या आगीत छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले. स्टेज, खुर्च्या, साऊंड सिस्टीम यांसह संपूर्ण अंतर्गत रचना मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. या घटनेनंतर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं (रिस्टोरेशन) काम सुरू करण्यात आलं आहे, पण ते अजूनही पूर्ण झालेलं नाही अशी पोस्ट मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी केली आहे.

स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो-व्हिडीओ, तसंच काही रंजक गोष्टी शेअर करताना दिसतात. अशातच त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये स्वप्नील राजशेखर म्हणतात, “निषेध नोंदवण्याचं कलाकारांकडे सर्वात प्रभावी माध्यम कोणतं? तर त्यांच्या कलेचं सादरीकरण… संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू होऊन वर्ष उलटून गेलं. रंगकर्मी आणि नाट्यरसिक नागरिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन्हा उभे राहण्याची प्राणांतिक वाट पहात आहेत. यावेळी नाट्यगृह आधीच्या सगळ्या त्रुटी काढून निर्दोष व्हावं, रंगकर्मी आणि प्रेक्षकांसाठी सर्वतोपरी सुसज्ज व्हावं आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावं इतकीच रास्त अपेक्षा आहे.”

या पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात, “नेहमीप्रमाणे सरकारी अनास्था, दिरंगाई याचा प्रत्यय येतोय. दिलेल्या मुदतीत कामं होत नाहीयेत. बांधकामात आताच मोठ्या त्रुटी दिसत आहेत आणि चालढकल सुरू आहे. प्रथेनुसार सगळं चाललंय… पण, आम्ही रंगकर्मी आणि नागरिक यंदा सावध आहोत. पहिल्यापासून लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे व्हावी यासाठी आग्रही आहोत. सध्या सुरू असलेल्या दिरंगाई आणि त्रुटीचा निषेध नोंदवण्यासाठी उद्यापासून रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आम्ही केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सध्याच्या अपूर्ण वास्तूमध्येच रंगमंचावर कलाविष्कार सादर करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेणार आहोत. शासकीय अनास्था ऐरणीवर आणणार आहोत…”

स्वप्नील राजशेखर यांची केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीबद्दलची पोस्ट

यानंतर स्वप्नील राजशेखर प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आवाहन करीत म्हणतात, “तुम्हा सर्व रसिक नागरिकांची साथ नेहमीप्रमाणे हवी आहे, भेटूया उद्यापासून भारतीय रंगभूमीचा मानबिंदू, कोल्हापूरची शान असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात…. “सिर्फ हंगामा खडा करना कोई मकसद नही, अपनी कोशिश है के सुरत बदलनी चाहिये’, जय नटेश्वर…”