Marathi Actress Disha Pardeshi : सोशल मीडियावर अनेक कलाकारांना बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यामुळे आजही कित्येक सेलिब्रिटी सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतात. तर, काही कलाकार या ट्रोलर्सना जिथल्या तिथे स्पष्ट भाषेत उत्तरं देतात. ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा परदेशीला सुद्धा असाच काहीस अनुभव आला.

दिशाने आजारपणाच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेतला होता. यानंतर काही महिन्यांनी तिने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. आता दिशाने निर्मिती क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलं आहे. अभिनेत्री नेहमीच तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच बिकिनी फोटोशूट केलं. दिशाच्या या फोटोंवर एका नेटकऱ्याने असभ्य कमेंट केली होती. याचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीने थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

“महाराष्ट्रात राहायची लायकी नाही तुमची…हिंदू धर्माची आणि मराठी कल्चरची XX XXX टाका, हे देवा आम्हाला काय- काय बघावं लागत आहे.” अशा दोन कमेंट्स या नेटकऱ्याने अभिनेत्रीच्या फोटोंवर केल्या होत्या. याचे स्क्रीनशॉट शेअर करत दिशा लिहिते, “या माननीय महोदयांना आता काय रिप्लाय देऊ हे मला समजत नाहीये… आपल्याला काही समजत असेल तर मला सांगावे…”

दिशाप्रमाणे यापूर्वी ऐश्वर्या नारकर, जुईली जोगळेकर या कलाकारांनी सुद्धा अशाप्रकारे स्क्रीनशॉट शेअर करत नेटकऱ्यांनी खडेबोल सुनावले होते. दरम्यान, दिशाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा स्क्रीनशॉट शेअर केल्यावर संबंधित नेटकऱ्याने लगेच या कमेंट्स डिलीट करत तिची माफी मागितली आहे.

disha
दिशा परदेशीने शेअर केला स्क्रीनशॉट ( Marathi Actress Disha Pardeshi )

दिशा परदेशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत ती मुख्य नायिकेची भूमिका साकारत होती. मात्र, आजारपणाच्या कारणास्तव तिने या शोमधून एक्झिट घेतली होती. आता दिशा पुन्हा छोट्या पडद्यावर केव्हा झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.