अभिनेत्री केतकी चितळे गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेले असताना केतकीने त्यांच्याशी हुज्जत घातली होती तसेच आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती ज्यामुळे सोशल मीडियावर ती चर्चेत आली. त्यानंतर काहीच दिवसांनी तिने मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर पोस्ट करत टीकाही केली होती. आता पुन्हा एकदा केतकीने मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे.

नुकतंच मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या ब्राह्मण असण्यावरुनही भाष्य केलं, ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर वातावरण तापलेलं आहे. बऱ्याच बड्याबड्या नेत्यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर टीका केली.

आणखी वाचा : अंदमानच्या जेलमध्ये रणदीप हुड्डाने केलेलं स्वतःला कैद; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेत्याची खास पोस्ट

अशातच आता अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या पोस्टमध्ये तिने कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरी तिची ही पोस्ट जरांगे यांच्या कालच्या वक्तव्यावर असल्याचं स्पष्ट होत आहे. पोस्टमध्ये केतकी म्हणाली, “कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःच्या कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक “महापुरुषांनी” एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. असो. जय हिंद! वंदेमातरम्! भारत माता की जय!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केतकीच्या या पोस्टमुळे बऱ्याच लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी तिच्यावरही लोकांनी टीका केली. इतकंच नव्हे तर लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. याआधीही केतकीने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही खासगी टिप्पणी केली होती ज्यामुळे तिला तुरुंगातही जावं लागलं होतं.