Marathi Actress Dance Performance : ‘मस्त मगन’, ‘कबिरा’, ‘चन्ना मेरेया’पासून ते ‘परम सुंदरी’पर्यंत या सगळ्या गाजलेल्या गाण्यांचे गीतकार म्हणून अमिताभ भट्टाचार्य यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी असंख्य बॉलीवूड चित्रपटांसाठी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अमित भट्टाचार्य यांनी लिहिलेली गाणी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यांनी २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लुटेरा’ सिनेमामध्ये एक खास गाणं लिहिलं होतं. यावर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींनी सुंदर नृत्य सादरीकरण केलं आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘लुटेरा’मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. पण, यातील सगळीच गाणी सोशल मीडियावर हिट ठरली. ‘मोंटा रे’ ( Monta Re ) हे गाणं तर आजही सर्वत्र ट्रेंडिंग असतं.
याच ‘मोंटा रे’ गाण्यावर मराठी सिनेविश्वातील दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी सुंदर सादरीकरण केलं आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी या दोघीजणी घराघरांत लोकप्रिय झाल्या. या दोघी उत्तम नृत्यांगना आहेत. त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर कायम सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
‘मोंटा रे’ या गाण्यावर सादरीकरण करताना वल्लरी व आलापिनी यांनी महिलांचा प्रेरणादायी जीवनप्रवास व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना दाखवला आहे. मुलीचा जन्म होतो, खेळायचं वय निघून गेल्यावर ती घरची कामं करू लागते, याचबरोबर अभ्यास करते. मग लग्न होतं, मुलांची जबाबदारी या सगळ्यात स्त्रिया स्वत:साठी जगतच नाहीत हीच संकल्पना वल्लरीने तिच्या परफॉर्मन्समधून सादर केली आहे.
वल्लरी व आलापिनी यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सुंदर खूप सुरेख सादर केलंत”, “गोड सादरीकरण केलंस मुलींनो”, “ही कथा प्रत्येक महिलेची आहे”, “तुमचे हावभाव एकदम परफेक्ट आहेत…नेहमीप्रमाणेच सुरेख”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.