Marathi Celebrity Couple New Home : आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे हक्काच्या घराचं स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र मेहनत करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. यंदाच्या वर्षी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांचं नव्या व आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. ‘ठरलं तर मग’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अमित भानुशालीने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिली. आता अमितच्या पाठोपाठ एका लोकप्रिय मराठी जोडीने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ही जोडी कोण आहे पाहुयात…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २३ डिसेंबर २०२४ रोजी ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सुरू झाली होती. यामध्ये नम्रता देसाई ही भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री मधुरा जोशीने नुकतीच नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मधुरा जोशी व तिचा पती अभिनेता गुरु दिवेकर यांनी मिळून हे नवीन घर खरेदी केलं आहे. गुरु दिवेकर सध्या ‘झी मराठी’वरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सोहमची भूमिका साकारत आहे. मधुरा आणि गुरु यांची ओळख ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. नंतर हळुहळू दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
आता गुरु आणि मधुरा यांनी आपलं पहिलं घर खरेदी केलं आहे. मधुराने तिच्या नव्या घराची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “पहिलं घर…नवीन घरातील आमचा पहिला बाप्पा. वारकरी आले आमच्या घरी” गुरु-मधुराने बाप्पाच्या स्वागतासाठी खास पंढरपूर वारीची सजावट केली आहे. तर, मधुराने शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये उकडीच्या मोदकांची झलक देखील पाहायला मिळत आहे. त्यांच्या नव्या घराच्या नेमप्लेट डिझाइनमध्ये खणाच्या साडीचा वापर करून त्यावर ‘गुरु अँड मधुरा’ अशी त्यांची नावं लिहिण्यात आली आहे.
दरम्यान, रेवती लेले, ऐश्वर्या नारकर, अभिजीत आमकर, गिरीजा प्रभू या कलाकारांनी गुरु आणि मधुरावर या नव्या घरासाठी कौतुकाचा वर्षाव केला आहे.