Nishad Bhoir & Aetashaa Sansgiri Engagement : अक्षया-हार्दिक, तितीक्षा-सिद्धार्थ असे रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणारे अनेक कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जीवनसाथी झाल्याचं आपण पाहिलंय. आता मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडप्याचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. यांचे फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘राजा राणीची गं जोडी’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’, ‘निवेदिता माझी ताई’ या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री एतशा संझगिरी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. एतशा संझगिरीचा साखरपुडा नुकताच पार पडला असून तिचा होणारा नवरा देखील मालिकाविश्वात सक्रिय आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत देवा ही भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता निषाद भोईर हा एतशाचा होणारा नवरा आहे. एतशा आणि निषाद यांनी यापूर्वी ‘निवेदिता माझी ताई’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. याशिवाय निषाद ‘आई – मायेचं कवच’, ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकांमध्येही झळकला आहे.

एतशा आणि निषाद यांच्यासह फोटो शेअर करत लोकप्रिय अभिनेता अंबर गणपुळेने त्यांच्या साखरपुड्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केल्याचं पाहायला मिळालं. एतशा-निषाद यांनी साखरपुड्यात दोन लूक केले होते. पहिल्या पारंपरिक लूकमध्ये एतशाने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर, दुसऱ्या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्रीने लेहंगा घातल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, एतशा आणि निषाद यांच्यावर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या सोहळ्याला एतशा-निषाद यांचे कलाविश्वातील जवळचे मित्रमंडळी सुद्धा उपस्थित होते.