Marathi Serial TRP List : ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका डिसेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेला रात्री साडेदहाचा स्लॉट देण्यात आला होता. रात्री उशिरा प्रसारित होऊनही ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. अर्णव-ईश्वरीची प्रेमकहाणी अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस उतरली. आता काही दिवसांपूर्वीच या दोघांचा विवाहसोहळा मालिकेत पाहायला मिळाला होता. यावेळी या मालिकेला रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला होता. यामुळे वाहिनीने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

२७ ऑक्टोबरपासून ‘काजळमाया’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामुळे वाहिनीवर काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. ते म्हणजे, ‘काजळमाया’ला साडेदहाचा स्लॉट देण्यात आला. तर, ११ वाजताची ‘अबोली’ मालिका ऑफ एअर करण्यात आली.

आता ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित केली जाते. तर, यश-कावेरीची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका रात्री ११ वाजता प्रक्षेपित केली जात आहे. मालिकेची वेळ बदलल्यावर ‘तू ही रे माझा मितवा’ला पहिल्याच आठवड्यात मोठं यश मिळालं आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने थेट दुसरं स्थान गाठलं आहे. ही संपूर्ण टीमसाठी आनंदाची बातमी आहे.

टीआरपीच्या यादीत नेहमीप्रमाणे ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानी आहे. या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी ‘तू ही रे माझा मितवा’, तिसऱ्या स्थानावर ‘घरोघरी मातीच्या चुली’, चौथ्या स्थानावर ‘नशीबवान’ आणि पाचव्या स्थानी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांचा क्रमांक लागतो.

याशिवाय मालिकेची वेळ रात्रीची ११ ची केल्यावर ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका टॉप-५ च्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. या सीरियलला २.२ टीआरपी मिळाला आहे. जो ‘अबोली’ मालिकेच्या तुलनेतही कमी आहे.

मराठी मालिकांचा टीआरपी

१. ठरलं तर मग – ५.५
२. तू ही रे माझा मितवा – ५.०
३. घरोघरी मातीच्या चुली – ४.४
४. नशीबवान – ४.३
५. लक्ष्मीच्या पाऊलांनी – ३.९
६. लग्नानंतर होईलच प्रेम – ३.८
७. कमळी – ३.६
८. लक्ष्मी निवास – ३.४ ( ८ ते ८:३० )
९. येड लागलं प्रेमाचं – ३.३
१०. वीण दोघांतली ही तुटेना – ३.२

दरम्यान, ‘काजळमाया’ या नव्या मालिकेचा ओपनिंग टीआरपी २.९ इतका आहे. यामध्ये अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा २५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यानचा टीआरपी ३.२ आहे. आता येत्या काही दिवसांत मालिकेत लग्नसोहळा सुरू होणार आहे. यादरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.