Mrunal Thakur Watches this Marathi Serial : गेल्या काही वर्षांत ओटीटी माध्यमांचं महत्त्व खूपच वाढलं आहे मात्र, असं जरी असलं तरी आजही मराठी मालिका घरोघरी पाहिल्या जातात. सध्या विविध वाहिन्यांवर अनेक नवनवीन विषयांवर आधारित असलेल्या मालिका सुरू आहेत. काही मालिका कौटुंबिक नात्यावर आधारित आहेत तर, काही मालिकांचं कथानक गूढ-थ्रिलर आहे. एकंदर काय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वाहिन्यांकडून नेहमीच असे आगळेवेगळे प्रयोग केले जातात.

अशाच एका ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेची भुरळ बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीला सुद्धा पडली आहे. छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात करणारी मृणाल ठाकूर आजच्या घडीला बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलीवूडसह मृणालने गेल्या काही वर्षात ‘हाय नाना’, ‘सीतारामम’, ‘द फॅमिली स्टार’ अशा गाजलेल्या साऊथ चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय. मात्र, शूटिंगमधून ब्रेक घेऊन घरी आल्यावर अभिनेत्री आपल्या आईबरोबर मराठी मालिका पाहते. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

मृणाल या व्हिडीओमध्ये म्हणते, “मराठी मालिका, तेल, आईच्या हातची केसांची चंपी आणि दोन वेण्या…छान झोप येईल. माझ्या आईची आवडती मालिका” आता मृणाल आणि तिची आई नेमकी कोणती मालिका पाहत आहेत असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. अभिनेत्रीने स्वत: या मालिकेची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.

मृणाल ठाकूर ‘झी मराठी’ची ‘तुला जपणार आहे’ ही मालिका पाहत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ही तिच्या आईची आवडती मालिका आहे असं मृणालने सांगितलं आहे. या मालिकेच्या निमित्ताने वाहिनीवर पहिल्यांदाच होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणारी ही थ्रिलर मालिका पाहताना अभिनेत्रीने खास स्टोरी शेअर केली आहे.

मृणालची इन्स्टाग्राम स्टोरी ‘झी मराठी’ वाहिनी आणि ‘तुला जपणार आहे’ या मालिकेतील कलाकारांनी रिशेअर करत अभिनेत्रीचे आभार मानले आहेत. दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये प्रतीक्षा शिवणकर, महिमा म्हात्रे, नीरज गोस्वामी, मिलिंद पाठक, निलेश रानडे, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे.