सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदा धनत्रयोदशी १८ ऑक्टोबरला ( शुक्रवारी ) साजरी केली गेली. हिंदू धर्मात धनत्रयोदशी हा अत्यंत शुभ आणि मंगलमय सण मानला जातो. दिवाळी उत्सवाची सुरुवात याच दिवशी होते. या शुभदिवशी घराघरांत धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विधीपूर्वक पूजा केली जाते.
पौराणिक कथेनुसार जगात आरोग्यशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भगवान विष्णुंनी दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरीचा अवतार धारण केला होता. यामुळेच हा दिवस साजरा केला जातो. यासंदर्भातील माहिती देणारे बरेच व्हिडीओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे बऱ्याच लोकांना ‘धनत्रयोदशी’चा नेमका अर्थ समजला.
लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या पत्नीचं सुद्धा असंच काहीसं झालं. ‘पारू’ फेम अभिनेता शंतनू गंगणेच्या पत्नीने याचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शंतनूची पत्नी त्याला उद्देशून म्हणते, “मला माफ करा… ‘धनत्रयोदशीचा’ खरा अर्थ आज समजला. शंतनू मी तुझी माफी मागते…कारणही सांगते. आज धनत्रयोदशी आहे आणि वयाच्या ४१ व्या वर्षी मला ही गोष्ट समजली की, याचा आणि सोनं-चांदी खरेदी करण्याचा काहीच संबंध नाहीये. यादिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते. हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरी….समुद्र मंथनाच्या वेळी ही देवता प्रकट झाली. लग्नानंतर मी तुला खूप त्रास दिला की, धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायचंय, चांदी खरेदी करायचीये. आज मला यामागचा खरा अर्थ समजला.” यानंतर एकच हशा पिकतो.
“सारांश – तुमच्या पतीला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यापूर्वी जरा रिसर्च करा.” असं शंतनूच्या पत्नीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शंतनू आणि त्याच्या पत्नीचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.