Zee Marathi Awards : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून यंदा लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादेला ‘सर्वोत्कृष्ट मुलगा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ‘पारू’ मालिकेत साकारलेल्या आदित्यच्या भूमिकेसाठी प्रसादला गौरवण्यात आलं आहे.
लाडक्या लेकाचं भरभरून कौतुक करण्यासाठी खास अभिनेत्याची आई या सोहळ्याला उपस्थित राहिली होती. पुरस्कार जिंकल्यावर प्रसादने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता लिहितो, “सर्वोत्कृष्ट अभिनेता ते सर्वोत्कृष्ट मुलगा…गेल्यावर्षी हा पुरस्कार मला माझ्या उत्तम कामासाठी मिळाला होता. यावर्षीचा पुरस्कार माझ्या कामासह वैयक्तिक आयुष्यातही तेवढाच महत्त्वाचा आहे. हे अवॉर्ड जाहीर झाल्यावर माझ्या आयुष्यातील तीन खास माणसं रंगमंचावर आली. माझी मम्मी प्रज्ञा जवादे, अमृताची आई वैशाली देशमुख आणि अमृता…त्या क्षणी मला खरंच मनापासून कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं! हे सरप्राइज झी मराठीने अमृतासह मिळून प्लॅन केलं होतं आणि तिने मला काहीही कळू दिलं नाही.”
“याचबरोबर पडद्यावरील आदित्यची आई मुग्धा कर्णिक ( अहिल्यादेवी ) आमची प्रोडक्शन टीम, ‘पारू’ मालिकेचे दिग्दर्शक आणि माझ्या सर्व सहकलाकारांचे खूप खूप आभार… ‘झी मराठी’ वाहिनी या सन्मानाबद्दल मी तुमचा कायम कृतज्ञ असेन. ट्रॉफीज येतात आणि जातात पण असे क्षण कायम मनात राहतात…हे क्षण ट्रॉफीच्या रुपात कायम लिव्हिंग रूममध्ये आणि माझ्या हृदयात असतील.” असं प्रसादने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रसाद जवादे मालिकेत आदित्य या आदर्श मुलाची भूमिका साकारताना दिसतो. खऱ्या आयुष्यात सुद्धा प्रसादचं आपल्या आईबरोबर खूपच खास नातं आहे. त्याच्या आईला गेल्यावर्षी कर्करोगाचं निदान झालं होतं. मात्र, या कठीण प्रसंगात सुद्धा प्रसादने न खचता अगदी श्रावणाबाळासारखी काळजी घेतल्याचं त्याच्या आईने सर्वांना सांगितलं.
प्रसादची आई म्हणाली, “रुग्णालयात सगळेजण त्याला श्रावणबाळ म्हणतात आणि खरोखरच तो आमच्यासाठी श्रावणबाळासारखा आहे. हा माझा आधुनिक काळातला श्रावणबाळ आहे. त्याला आज जे पारितोषिक मिळालंय ते तंतोतंत खरं आहे.” प्रसादला यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.