Hina Khan & Sonali Bendre Gets Emotional : अभिनेत्री सोनाली बेंद्रे व हिना खान दोघी सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमातून झळकत आहेत. सोनाली बेंद्र कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आहे तर हिना खान यातील स्पर्धक आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोघीही त्यांच्या खासगी आयुष्यात एका मोठ्या संकटातून बाहेर आलेल्या आहेत. दोघींनाही कर्करोगाचं निदान झालेलं, परंतु आता दोघीही कर्करोगाच्या विळख्यातून यशस्वीरीत्या बाहेर पडलेल्या आहेत.
‘पती पत्नी और पंगा’मुळे दोघी अनेकदा चर्चेत असतात. अशातच आता या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये रुबिना दलिकला एक टास्क दिलेला दिसतो. जिथे तिला प्रेक्षकांमधील एका व्यक्तीला केस कापण्यासाठी तयार करायचं असतं. यामुळे हिना व सोनाली भावूक झाल्याचं समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळतं.
पती पत्नी और पंगाचा प्रोमो
‘कलर्स टीव्ही’ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या या प्रोमोमध्ये रुबिनाला टास्क दिल्यानुसार ती प्रेक्षकांमधील एका महिलेला तिचे केस कापण्यासाठी तिच्याशी बोलताना दिसते. त्यादरम्यान मनव्वर फारुकी “एवढे मोठे केस कोणी कापणारच नाही” असं म्हणतो. त्यावर रुबिना “का नाही कापणार” असं म्हणते. पुढे सोनाली टास्कबद्दल सांगत “आपल्या या रिअलिटी चेकमध्ये खूप धाडस आणि खरेपणा असेल” असं म्हणताना दिसते.
प्रोमोमध्ये पुढे रुबिना तिच्या हातातील बॉक्सवरील स्टीकर काढून बघते, तर त्यावर डेअर असं लिहिलेलं असतं. म्हणजेच तिला जो काही टास्क दिला जाईल तो तिला पूर्ण करावा लागेल. रुबिनाच्या हातातील बॉक्समध्ये तुम्हाला कोणत्याही एका व्यक्तीला त्यांचे स्वत:चे केस कापण्यासाठी तयार करावं लागेल असं लिहिलेलं असतं. ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. पुढे केस कापण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणल्या जातात. त्यानंतर रुबिना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेला “एकदा मला तुमचे केस कापू दे, तुम्ही खूप छान दिसाल” असं म्हणते.
पुढे ती महिला रुबिनाला “तुमच्यासाठी थोडे केस कापू शकते” असं म्हणते, जे ऐकून सगळे स्पर्धक टाळ्या वाजवतात. पुढे ती महिला केस कापण्याआधी “मी असा विचार केला होता की माझे केस मी कुठल्या तरी एका कर्करोग असलेल्या व्यक्तीला दान करेन” असं म्हणते. जे ऐकून हिना व सोनाली भावूक होतात. पुढे ती महिला रुबिनाला “तुम्ही माझे अजून केस कापू शकता” असं म्हणते, त्यानंतर रुबिना नक्की असं विचारते; त्यावर ती हो म्हणते. त्यानंतर रुबिना तिचे अर्धे केस कापते. महिलेचे केस कापताना पाहून सोनाली बेंद्रे व हिना यांना अश्रू अनावर होतात.
हिना खान व सोनाली बेंद्रे भावुक
सोनाली व हिना एकमेकींना मिठी मारतात आणि हिना त्या महिलेला भावूक होत “हे करण्यासाठी खूप धन्यवाद, तुम्हाला कल्पना नाहीये, यामुळे एखाद्या व्यक्तीला किती आनंद मिळू शकतो. मी रोज विग घालते, हे केससुद्धा कोणाचे तरी आहेत; जे असंच यांच्यासारख्या कोणीतीरी दिले असतील” असं म्हणते. त्यावर सोनालीसुद्धा त्या महिलेला, “आता तुम्ही जितक्या सुंदर दिसत आहात, त्याहीपेक्षा जास्त सुंदर तुमचं मन आहे” असं म्हणते. ‘पती पत्नी और पंगा’ हा कार्यक्रम ‘कलर्स टीव्ही’वर शनिवार व रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होतो. हा भागही प्रेक्षकांना येत्या शनिवार व रविवारमध्ये पाहायला मिळणार आहे.