Prajakta Gaikwad Wedding : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. सध्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
७ ऑगस्टला प्राजक्ताचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. साखरपुड्याच्या दिवशी प्राजक्ताने तिचे होणारे पती शंभुराज खुटवड यांच्यासह पहिला फोटो शेअर केला. आता सध्या प्राजक्ताच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नपत्रिकेची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. प्राजक्ताचं लग्न २ डिसेंबरला पार पडणार आहे.
प्राजक्ता नुकतीच आपली लग्नपत्रिका घेऊन आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळजापूरला पोहोचली होती. याठिकाणी तिने हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला आणि यानंतर अभिनेत्रीच्या नातेवाईकांनी तिच्यासाठी खास केळवण आयोजित केलं होतं.
प्राजक्ताने तिच्या पहिल्या केळवणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी तिच्या केळवणासाठी छान सजावट केली होती. यासह तिच्यासाठी खास जेवणाचे विविध पदार्थ बनवण्यात आले होते. प्राजक्ताने हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या साखरपुड्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्री या सोहळ्यात फारच सुंदर दिसत होती. त्यामुळे आता प्राजक्ता लग्न लागताना काय लूक करणार, कोणती साडी नेसणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर शंभुराज खुटवड उद्योजक आहेत. या दोघांची पहिली भेट प्राजक्ताच्या गाडीला एका ट्रकवाल्याने धडक दिल्यामुळे झाली होती. हा ट्रक शंभुराज यांच्या मालकीचा होता. या अपघतात अभिनेत्रीच्या गाडीचं नुकसान झाल्याने प्राजक्ताला शंभुराज स्वत: सेटवर सोडायला गेले होते. पहिल्या भेटीनंतर प्राजक्ता आणि शंभुराज यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी शंभुराज यांनी प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली. या दोघांचा विवाहसोहळा २ डिसेंबरला पार पडणार आहे.
