अलीकडे मानसिक आरोग्याबद्दल अनेकजण विविध माध्यमांवर व्यक्त होताना दिसत आहेत. अनेक कलाकार मंडळीही त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल सोशल मीडियाद्वारे पोस्ट किंवा माहिती शेअर करत असतात. अनेक कलाकार त्यांचे स्वत:चे अनुभव व प्रसंगही सांगतात. स्वत:च्या अनुभवातून चाहत्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या कलाकारांचा प्रयत्न असतो. अशातच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मानसिक आरोग्याबद्दची एक पोस्ट शेअर केली आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील सावनी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) सोशल मीडियाद्वारे मानसिक आरोग्याबद्दलची विशेष पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना, प्रसंग शेअर करत असते. त्यातच वडील आणि भाऊ गेल्यानंतरच्या परिस्थितीबद्दलही अभिनेत्री अनेकदा व्यक्त झाली आहे. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली मानसिक आरोग्याबद्दलची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

या पोस्टमधून अपूर्वाने असं म्हटलं आहे की, “एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून, लोक अनेकदा ग्लॅमर, हास्य, शक्ती पाहतात. पण क्वचितच पडद्यामागे आम्ही अनेक मूक लढाया लढत असतो. माझ्या आयुष्यातील दोन सर्वात महत्त्वाच्या पुरुष ते म्हणजे माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ गमावल्यानंतर आयुष्य कधीच पूर्वीसारखे राहिले नाही. असे काही क्षण येतात जेव्हा मला सुरक्षित वाटत नाही, काही ऐकले किंवा पाहिले जात नाही. मी अनेकदा त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाची आणि पाठिंब्याची आतुरतेने वाट पाहत असते.”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षांत, मी धाडसी चेहरा धारण करायला शिकले आहे. मी ठीक नसूनही अनेकदा ठीक असल्याचे भासवलं आहे आणि आता मला हे सांगावंस वाटतं की, दुःख करणे ठीक आहे. निराश होणे ठीक आहे. खंबीर असणे हा एकमेव पर्याय असताना तुम्ही एकटे चालणे ठीक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जे वाटते ते कधीही दुर्लक्ष करू नका. कारण मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे.”

यापुढे अपूर्वाने असं म्हटलं आहे की, “तुमच्या भावना वैध आहेत आणि तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे इतर कोणत्याही गोष्टी इतकेच महत्त्वाचे आहे. अशाच टप्प्यातून जात असलेल्या प्रत्येकासाठी, मी सांगू इच्छिते की, तुम्ही एकटे नाही आहात. धाडसी व्हा. दयाळू व्हा. आयुष्यातल्या सर्व अनिश्चिततेसह आणि वेदनांसह स्वत:ला स्वीकारा. कारण अगदी कठीण क्षणांमध्येही सौंदर्य आहे. आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणे, आपल्या प्रियजनांची आठवण येणं आणि तरीही पूर्णपणे जगण्याचे धैर्य शोधणे सामान्य करूया. कधीही हार मानू नका.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अपूर्वाने धाकटा भाऊ आणि वडील यांना अचानक गमावले आहे. याचा तिच्या मनावर मोठा आघात झाला असून यातून ती सावरण्याचा प्रयत्न करताना दिसते. अभिनेत्री अनेकदा त्यांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर करते. अशातच तिने मानसिक आरोग्याबद्दल भाष्य करणारी विशेष पोस्ट शेअर केली आहे.