Priyadarshini Indalkar : अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. टेलिव्हिजन, रंगभूमी व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने काम केले आहे. प्रियदर्शिनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली. या कार्यक्रमामुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. प्रियदर्शिनी मूळची पुण्याची आहे. परंतु, कामानिमित्त ती आधीपासूनच अनेकदा मुंबईत येत असते. त्यावेळी मुंबईत नवीन असताना तिला अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने अनेकदा मदत केल्याचे तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमधून सांगितलं आहे.
प्रियदर्शिनीने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने भार्गवी चिरमुलेबद्दल सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये तिला तुला कोणाच्या घरी जेवायला जायला आवडेल, असे विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली, “मला भार्गवी चिरमुलेकडे जेवायला जायला आवडेल. किंवा तिला माझ्याकडे बोलवायला आवडेल”. पुढे प्रियदर्शिनी म्हणाली, “जेव्हा मी मुंबईत नवीन होते तेव्हा मी नाटकासाठी ये-जा करायचे. सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांच्या ‘आमच्या ही चं प्रकरण’ नावाच्या नाटकात मी काम करत होते”.
प्रियदर्शिनी पुढे म्हणाली, “नाटकाच्या १०० व्या प्रयोगानंतर मी रिप्लेसमेंट म्हणून काम करायचे. त्यामुळे मुंबईत राहावं लागायचं किंवा आम्हाला नाटकामुळे उशीर व्हायचा तेव्हा अनेकदा मी भार्गवीताईच्या घरी राहिले आहे. खरं तर माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिनं मला पोसलं आहे. ती अनेकदा मला तिच्याबरोबर घेऊन जायची. बऱ्याचदा मी तिच्याबरोबरच पुणे – मुंबई असा प्रवास करायचे”.
भार्गवीबद्दल प्रियदर्शिनी पुढे म्हणाली, “जेव्हा मी तिच्या घरी राहायचे तेव्हा ती तिच्या कामासाठी बाहेर जाण्याआधी माझ्यासाठी जेवण करून जायची. मग ती तिच्या कामासाठी गेली की, मी माझ्या कामाच्या वेळेनुसार उठायचे आणि तिनं बनवलेलं जेवण वगैरे जेवून निघायचे. त्यामुळे मला माझ्या हातचं तिला खाऊ घालायला खूप आवडेल. एका नाटकात मी तिच्या मुलीची भूमिका केली होती आणि खऱ्या आयुष्तही आमचं नातं तसंच काहीसं आहे”.