छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. गेला रविवारीच या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला. या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. तर आता ‘झी मराठी’ने प्रेक्षकांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे. हे सरप्राईज म्हणजे याच पहिल्या भागाचा उर्वरित भाग उद्या प्रसारित होणार आहे. या नव्या भागाच्या काही व्हिडीओ क्लिप्स आता खूप व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमात येऊन राज ठाकरे यांनी विविध गोष्टींवर मनमोकळा संवाद साधला. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमामध्ये स्वतःला आणि इतरांना खुपणाऱ्या गोष्टींबद्दल भाष्य केलंच पण याचबरोबर त्यांना नेहमीच साथ करत आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही ते भरभरून बोलले. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनविसेचे अध्यक्ष आहेत. पण अमित ठाकरे यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहून महेश मांजरेकर यांनी त्यांना एका चित्रपटाची ऑफर दिली होती, असं म्हणत तो चित्रपट कोणता होता, यावर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला काय वाटलं?” राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

अवधूत गुप्तेने या कार्यक्रमात राज ठाकरे यांना म्हटलं, “अमित हा अत्यंत गुणी आणि हँडसम मुलगा आहे. दिग्दर्शक म्हणून माझी नजर त्याच्यावर होती.” तर त्यावर राज ठाकरे म्हणाले, “महेशची नजर गेली होती ना. पण पहिल्याच चित्रपटाचं नाव सांगितल्यावर मी अमितला म्हटलं जरा थांब.” त्यावर अवधूतने विचारलं, “कोणता चित्रपट?” त्यावर राज ठाकरे म्हणाले, “एफ यू.” यानंतर “मी महेशला सांगितलं की, वडील बोलतोय तोवर ठीक आहे, पण मुलाला कशाला आणतोस त्याच्यात!,” असं राज ठाकरे गमतीत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : त्वचा फाटली, ओठांचे तुकडे झाले अन्…; राज ठाकरेंनी सांगितला पत्नी शर्मिला यांच्या बाबतीत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग

तर ‘खुपते तिथे गुप्ते’चा हा भाग प्रेक्षकांना उद्या दुपारी १२ वाजता ‘झी मराठी’वर पाहायला मिळेल.