राखी सावंतला मंगळवारपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत आणि पोटात दुखू लागल्याने अभिनेत्रीला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंग राखीच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर करत असतो. याआधी त्याने सांगितलं होतं की तिच्या गर्भाशयात ट्यूमर आहे. या ट्यूमरसाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आता राखीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ रितेशने शेअर केला असून यात राखी शस्त्रक्रियेसाठी जाताना दिसत आहे. या व्हिडीओत राखीने गुलाबी रंगाचा रुग्णांचा पोशाख घातलाय असं दिसतंय आणि ती ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना दिसतेय. तिच्याबरोबर दोन परिचारिका आहेत. रितेशने हा व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं की, “राखी म्हणाली, मला खूप रडायला येतंय पण मला देवावर विश्वास आहे की ते माझं वाईट कधीच करणार नाहीत.”

रितेशने पुढे लिहिलं, “राखी ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे, तिला तिच्या आईची खूप आठवण येतेय. ती लोकांनी मतदान करावं यासाठीदेखील विनंती करतेय.”

हेही वाचा… “…अन् मला कॉम्प्रोमाईजसाठी विचारलं”, शर्मिष्ठा राऊतने सांगितला ‘तो’ वाईट अनुभव, म्हणाली…

राखीचा अजून एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत राखी स्वत: चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल सांगताना दिसतेय. राखी म्हणते, “नमस्कार, शेवटी तो टप्पा आलाच, मी आता ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे. मी हसत हसत जाणार आहे आणि हसत हसत येणार आहे. आजपर्यंत खूप मोठमोठ्या दुःखांचा मी सामना केलाय, माझ्यासाठी प्रार्थना करा.”

“आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे. हे सगळं खरंच खूप वेदनादायक आहे. मला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात आहेत. मला आशा आहे की, मी लवकरात लवकर बरी होऊन येईन. मला माहीत आहे की तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रार्थना करत आहात. माझ्या शरीरात एक ट्यूमर आहे, डॉक्टर तो ट्यूमर काढतील, मी परत येईन. मी नाचून गाऊन पुन्हा तुमचं मनोरंजन करेन”, असंही राखी म्हणाली.

हेही वाचा… VIDEO: “निवडणूक संपली, प्रचार संपला”, रितेश देशमुख आणि जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

राखीचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमुळे आता सगळ्यांनाच खात्री पटली आहे की तिला गंभीर आजारपण आहे आणि ती हे पब्लिसिटी स्टंट म्हणून करत नाही आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर राखी लवकर बरी हो, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत, अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंगने याआधी असंही सांगितलं होतं की, राखीला कर्करोग असण्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. राखीची ही शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर तिच्या प्रकृतीबद्दल अजून स्पष्ट सांगू शकतील.