Sai tamhankar Talks About Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार यामध्ये विविध स्किट सादर करीत त्यांच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असतात. त्यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर परीक्षक म्हणून पाहायला मिळते. अशातच तिने या कार्यक्रमाबद्दल नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाबद्दल बोलताना सईने एका मुलाखतीत या कार्यक्रमात तिला व प्रसाद ओकला स्किटवर हसण्यासाठी कुठलीही जबरदस्ती केली जात नसल्याचं म्हटले आहे. नुकतेच ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “याबद्दलचे मी दोन खूप महत्त्वाचे मुद्दे सांगेन. त्यासाठीचं सगळं श्रेय मी चॅनेलला आणि आमच्या दिग्दर्शकांना देते. आम्हाला मला आणि प्रसाद ओकला कधीच कोणी येऊन असं सांगितलेलं नाहीये की थोडं हसा वगैरे.”
आमच्यावर काही प्रेशर नाहीये – सई ताम्हणकर
सई याबद्दल पुढे म्हणाली, “आम्हाला जर हसायला येत नसेल, तर आम्ही ढिम्म बसलेलो असतो. आमच्यावर काही प्रेशर नाहीये की हसा, तुम्हाला हसायला बसवलंय. आम्ही तिथे रसिक म्हणून खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला बसलेलो असतो. आम्ही त्याचा आस्वाद घ्यायला बसलोय आणि हे बंधन नसणं हे खूप महत्त्वाचं आहे.”
सई पुढे म्हणाली, “दुसरी गोष्टी पहिल्या दिवसापासून आम्हाला कधीच कोणी सांगितलं नाही की, हे बोला, हे बोलू नका. आम्हाला कायमच असं सांगितलं गेलं की, व्यक्त व्हा. काय ठेवायचं, काय नाही हे आमच्या हातात आहे; पण तुम्ही व्यक्त व्हा. मला असं वाटतं की, हे स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे आणि अशा कार्यक्रमांमध्ये या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात आणि कदाचित आमच्या कार्यक्रमाच्या यशामागचं गमक यातच आहे. “
सईने केलं समीर चौघुलेंचं कौतुक
सईने पुढे समीर चौघुले यांचं कौतुक केलं आहे. समीर चौघुलेंबद्दल ती म्हणाली, “अशक्य आहे तो माणूस. भाग्यशाली आहे तो. एक पंच पडला की, दुसऱ्याच्या शोधात असतो तो. इतकी वर्षं काम करूनही त्याच्यातली ही हाव संपली नाहीये आणि हे खूप कौतुकस्पद आहे.”