Sankarshan Karhade Meets Minister Nitin Gadkari : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संकर्षण उत्तम अभिनेता आहेच पण, याचबरोबर तो खूप चांगला कवी देखील आहे. त्याच्या विविध सामाजिक विषयांवरच्या कविता कायम सर्वांचं मन जिंकून घेतात. संकर्षण सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
संकर्षण कऱ्हाडेने नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी अभिनेत्याला खास भेटवस्तू दिली. तसेच या भेटीदरम्यान काय-काय गप्पा मारल्या याबाबत संकर्षणने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
“आज दिल्ली मध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट झाली… त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक, स्वाक्षरी करुन भेट म्हणून दिलं. त्यांच्या भेटीसाठी मिळालेल्या अर्ध्या तासाच्या वेळेत गप्पांचे विषय हे घर, घरातली माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि “खाणं…” असे चौफेर होते. वाह! मज्जाच आली… थँक्यू सर! ही खास भेट घडवून आणल्याबद्दल आमचे मित्र अंकित यांचे आभार!” असं संकर्षण कऱ्हाडेने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नितीन गडकरी यांनी संकर्षणला India Aspires हे त्यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. या पुस्तकाच्या पहिल्या पानावर नितीन गडकरींनी स्वत:ची स्वाक्षरी देखील केली आहे. याचा फोटो सुद्धा अभिनेत्याने शेअर केला आहे.
संकर्षणने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान, अभिनेता सध्या रंगभूमीवर सक्रियपणे काम करतोय. त्याचा आणि स्पृहा जोशीचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याशिवाय संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’, ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकांचे प्रयोग सुद्धा हाऊसफुल सुरू आहेत.