Zee Marathi Awards 2025 Video : मालिकाविश्वात काम करणारे सगळेच कलाकार दिवसरात्र मेहनत करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. अनेकदा आपली कौटुंबिक जबाबदारी, आजारपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून या कलाकारांना ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत आपल्या कामाला प्राधान्य द्यावं लागतं. या कलाकारांना आपल्या कामाची पोचपावती पुरस्कार सोहळ्यांमध्ये मिळते.

‘झी मराठी’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. याचं प्रक्षेपण येत्या ११ आणि १२ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या सोहळ्यात यावर्षी कोणती मालिका बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच वाहिनीने पुरस्कार सोहळ्यातील एका भावनिक प्रसंगाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री प्राप्ती रेडकर प्रमुख भूमिका साकारत आहे. सावलीला या सोहळ्यात पुरस्कार मिळताच एक खास सरप्राइज देण्यात आलं आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा निर्माता आदिनाथ कोठारे सावलीच्या खऱ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीला घेऊन मंचावर आला होता. यावेळी सर्वप्रथम सावलीच्या डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर त्या खास व्यक्तीचा स्पर्श होताच प्राप्तीचे डोळे मंचावरच पाणावले. कारण, तिला भेटायला तिची लाडकी आजी आली होती.

प्राप्ती यावेळी आजीला मिठी मारून रडली. तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाली, “माझी नानी इथे आलीये. तिला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यामुळे ती कोणालाच ओळखत नव्हती. नानी तेव्हा फक्त मलाच ओळखत होती. यावरून तिचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला समजलंच असेल.”

आजी आणि नातीचं हे सुंदर नातं पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. मेघा धाडेला सुद्धा यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ‘झी मराठी’ने शेअर केलेल्या या प्रोमोवर कमेंट करत प्राप्ती लिहिते, “कधीही न विसरता येणारा हा क्षण आहे… थँक्यू झी मराठी.”

यानंतर सावलीला पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता सावलीला नेमका कोणता पुरस्कार मिळालाय हे ११ आणि १२ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. काही नेटकऱ्यांनी सावली यंदाची सर्वोत्कृष्ट नायिका ठरली असावी असा अंदाज कमेंट्समध्ये व्यक्त केला आहे.