Shashank Ketkar Wife Priyanka Started New Business : मराठी मालिकाविश्वातून घराघरांत पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरच्या पत्नीने दिवाळीच्या मुहूर्तावर खास माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्याची पत्नी प्रियांका ढवळेने नवीन व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय नेमका कोणता आहे, प्रियांकाने तिच्या नव्या ब्रँडचं नाव नेमकं काय ठेवलंय जाणून घेऊयात…
शशांकची पत्नी प्रियांका ही पेशाने वकील आहे. तिने साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. ‘House Of Ru-Ra’ असं तिच्या ब्रँडचं नाव आहे. ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून प्रियांकाकडून साड्या खरेदी करता येणार आहेत. या ब्रँडचं नाव प्रियांकाने दोन्ही मुलांच्या नावावरून ठेवलं आहे. शशांक-प्रियांकाच्या मुलाचं नाव ऋग्वेद तर, मुलीचं नाव राधा आहे. यांच्या इंग्रजी स्पेलिंगमधील ‘Ru-Ra’ ही पहिली दोन अक्षरं घेऊन प्रियांकाने तिच्या नव्या ब्रँडचं नाव जाहीर केलं आहे.
याचबरोबर प्रियांका Rainbow Twinkles या तिच्या दुसऱ्या एका ब्रँडच्या माध्यमातून ब्युटी प्रोडक्ट्स सुद्धा विकते. आता नवा साड्यांचा व्यवसाय सुरू केल्यावर प्रियांकावर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नव्या व्यवसायाबद्दलची पोस्ट शेअर करत प्रियांका लिहिते, “ही एक नवीन सुरुवात आहे… मी घेतलेल्या कष्टाचं यशात रुपांतर होऊदेत…तुम्हा सर्वांची साथ मोलाची आहे…असेच आशीर्वाद कायम राहुद्यात. #SmallBusiness”
दरम्यान, शशांकच्या कामाबद्दल सांगायचं झालं, चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘मुरांबा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. २०१७ मध्ये शशांक प्रियांकाचा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे. तर, यावर्षी जानेवारी महिन्यात शशांक-प्रियांकाला मुलगी झाली. तिचं नाव अभिनेत्याने राधा असं ठेवलं आहे.