Shiv Thakare : अमरावतीचा शिव ठाकरे आता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ व हिंदी अशा विविध रिअ‍ॅलिटी शोजमुळे शिवला घराघरांत लोकप्रियता मिळाली. त्याच्या सरळ साध्या स्वभावाने अल्पावधीतच प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं. शिव उत्तम डान्सर सुद्धा आहे. याशिवाय शिव ठाकरेचं आपल्या कुटुंबीयांबरोबर असलेलं सुंदर नातं चाहत्यांना कायमच भावतं. विशेष म्हणजे शिवचे त्याच्या आजीबरोबरचे रील व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असतात.

शिव ठाकरेने नुकताच त्याच्या आजीच्या वाढदिवसाचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण म्हणेल नातू असावा तर असा! कारण, आजीला वाढदिवसाचं सरप्राइज देण्यासाठी शिव खास मुंबईहून त्याच्या मूळ घरी पोहोचला होता. आजीच्या वाढदिवसानिमित्त शिवने खास तयारी केली होती.

गुलाबाच्या पाकळ्या व फुलांची सजावट, लाल रंगाचे फुगे, सुंदर बर्थडे केक या सगळ्याची झलक शिवच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्याच्या सगळ्या कुटुंबीयांनी मिळून त्याच्या लाडक्या आजीचं औक्षण केलं.

शिव ठाकरे म्हणतो, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. कारण माझी गर्लफ्रेंड, माझी प्यारी आजी… तिचा आज वाढदिवस आहे. मुंबईवरून मी निघालोय… फक्त मी १२ वाजायच्या आधी घरी पोहोचलो पाहिजे. कारण, ती जगातील सगळं प्रेम डिझर्व्ह करते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझी लक्ष्मी, माझी आजीबाई…”

नातवाने इतका सुंदर वाढदिवस साजरा केल्यावर शिवच्या आजीच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. शिवने दिलेलं सरप्राइज पाहून आजी खूप भारावून गेली होती. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “सर्वात सुंदर नातं”, “शिव तुझ्या आणि आजीच्या दोघांच्याही ओठावरचं हे हसू कायम असंच राहावं”, “आजीला उदंड आयुष्य लाभो” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.

दरम्यान, शिव ठाकरेने शेअर केलेल्या या व्हिडीओला अवघ्या चार तासांत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.