Amtabh Bachchan Spoke About Smita Patil : स्मिता पाटील यांनी त्यांच्या अभिनयाने सिनेमा रसिकांच्या मनात घर केलंय, त्यामुळेच आज त्या हयात नसतानाही अनेक जण त्यांच्या कामाचं कौतुक करत असतात; तर आजही नामांकित कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं. मोठ मोठे कलाकारही त्यांचं कौतुक करताना दिसतात. बिग बींनीसुद्धा स्मिता यांच्याबद्दल सांगितलेलं.

स्मिता यांनी १९७० च्या दरम्यान चित्रपटांत काम करायला सुरुवात केलेली. त्यांनी ‘निशांत’, ‘मंथन’ आणि ‘भूमिका’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं होतं. त्यांनी नेहमीच विविध धाटणीच्या भूमिकांना पसंती दिली. ‘इंडिया टुडे’सह संवाद साधताना स्मिता पाटील यांनी याबद्दल सांगितलेलं. त्या म्हणालेल्या, “मी विचार केला होता की फक्त एक व्यावसायिक चित्रपट करेन, पण व्यावसायिक हिंदी चित्रपटांतून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. मला माहीत आहे की मला चांगल्या चित्रपटांत काम करायचं आहे, पण चांगले दिग्दर्शक भेटणं खूप कठीण असतं आणि बऱ्याचदा चांगले दिग्दर्शक नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देतात. मी आशा करते की मला जबरदस्तीने व्यावसायिक चित्रपटांत काम करावं लागणार नाही.”

स्मिता यांनी सिनेमासाठी स्वत:ला जोखून दिलेलं, पण शेवटी त्यांना समजलं की सिनेमा हा बिझनेस आहे. त्यांना जर फक्त कलाकार म्हणून काम करायचं असतं तर त्यांना काही गोष्टींचा त्याग करावा लागला असता. स्मिता यांनी ‘शक्ती’, ‘नमक हलाल’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं, जे त्यांच्या ‘बाजार’, ‘अर्ध सत्य’ यांसारख्या सिनेमांपेक्षा वेगळे होते. पण, १९८० च्या दरम्यान स्मिता यांना समजलं होतं की जर लोकांनी त्यांची कलाकृती पाहण्यासाठी पैसे खर्च करावे असं वाटत असेल, तर त्यांना त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण करावा लागेल; जे फक्त बिग बजेट सिनेमांमुळेच होऊ शकतं.

स्मिता पाटील यांची बहीण मानया पाटील सेठ यांनीसुद्धा याबद्दल सांगितलेलं. त्या ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत स्मिता यांच्याबद्दल म्हणालेल्या की, “तिला समाजिक विषयांवर आधारित चित्रपटांत काम करायचं होतं, पण यामुळे तिला काही भूमिका गमवाव्या लागल्या. तिने सगळ्यात मोठा चित्रपट गमावला तो होता यश चोप्रा यांचा ‘सिलसिला.'” स्मिता यांच्या जागी नंतर या चित्रपटात जया बच्चन झळकलेल्या.

अमिताभ बच्चन यांनी स्मिता पाटील यांच्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांनीसुद्धा स्मिता यांच्याबद्दल सांगितलेलं. स्मिता यांनी ‘नमक हलाल’मध्ये त्यांच्याबरोबर काम केलेलं. १९८२ मध्ये आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केलेलं. यामध्ये त्यांनी अमिताभ यांच्या प्रेयसीची भूमिका साकारलेली. यामध्ये त्यांना अमिताभ यांच्याबरोबर डान्ससुद्धा करायचा होता, जे करताना त्या अस्वस्थ होत्या. याबद्दल काही वर्षांनंतर त्यांनी त्यांच्या ब्लॉगमधून सांगितलेलं. बिग बी स्मिता यांच्याबद्दल म्हणालेले की, “ती चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंगदरम्यान अस्वस्थ होती, तिला ती हा चित्रपट का करत आहे हेच माहीत नव्हतं.”

२०१५ मध्ये स्मिता पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान अमिताभ बच्चन यांनी स्मिता यांच्याबद्दल सांगितलेलं. ते म्हणालेले की, “तिला असं वाटलेलं की, असं काम करणं तिच्या संस्कृतीच्या बाहेर जाणारं आहे. ती मला म्हणालेली की तिने इतक्या चांगल्या चित्रपटांत काम केलं आहे, पण एकदा ती एअरपोर्टवर असताना जेव्हा तिला कोणीतरी ‘नमक हलाल’मधील तिच्या भूमिकेसाठी ओळखलं, तेव्हा तिला ते फार आवडलं नव्हतं.”