Sonali Bendre on decision to work in TV: अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही तिच्या एकापेक्षा एक बॉलीवूड चित्रपटांसाठी ओळखली जाते. सोनालीच्या ‘हम साथ साथ है’, ‘सरफरोश’, ‘मुरारी’, ‘दिलजले’, ‘दिल ही दिल में’, ‘कल हो ना हो’ अशा अनेक चित्रपटांतील भूमिका खूप मोठ्या प्रमाणात गाजल्या.
सोनाली बेंद्रे काय म्हणाली?
गाजलेल्या चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेत्रीने टेलिव्हिजनवर काम करण्याचा निर्णय घेतला. ‘हम साथ साथ है’, ‘सरफरोश’ या चित्रपटांतील तिच्या भूमिका खूपच गाजल्या होत्या. मात्र, जेव्हा तिने टेलिव्हिजनवर काम करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तिच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कलाकारांना आश्चर्य वाटले होते. त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिला काय करायचे आहे, हे तिला कळत नसल्याचे अनेकांनी म्हटले होते.
अभिनेत्रीने ‘क्या मस्ती क्या धूम’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. अभिनेत्रीने नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या या निर्णयाबाबत वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “या निर्णयाकडे वळून पाहताना हा सर्वोत्तम निर्णय असल्याचे तिने म्हटले. लोकांना वाटत होते की, मी टीव्हीवर काम करण्याचा निर्णय का घेतला? मी टीव्हीवर काम का करत आहे? पण, मला त्या शोची संकल्पना आवडली होती. त्याचे मानधनही चांगले मिळत होते.”
सोनालीने असाही खुलासा केला की, टेलिव्हिजनवर काम करण्याच्या निर्णयाला तिचा पती गोल्डीने साथ दिली होती. तो म्हणालेला की, टेलिव्हिजनला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. मी त्याचे ऐकले आणि हा निर्णय घेतला.
अभिनेत्री असेही म्हणाली की, ज्या रिअॅलिटी शोमध्ये मुलांनी मला पाहिले होते. ती मुले आता मोठी झाली आहेत. पण, त्यावेळी त्यांनी मला ज्या वयात पाहिले होते, त्यांना मी तशीच आठवते. एका कलाकारासाठी ही मोठी गोष्ट आहे.
पुढे अभिनेत्री म्हणाली की, टेलिव्हिजनवर काम करण्यामुळे काम आणि घर सांभाळता आले. जेव्हा मला बाळ झाले, तेव्हा मी या शोमध्ये काम करत होते. त्या काळात मी फार अभिनय करीत नव्हते. माझा मुलगा मोठा होत होता. मला त्या काळात माझ्या मुलाबरोबर असणे जास्त गरजेचे वाटत होते.
सोनालीने ‘इंडियन आयडॉल ४’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘हिंदुस्तान के हुनरबाज’, ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’, ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले. ती सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात होस्ट म्हणून काम करत आहे.
‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात देबिना बॅनर्जी-गुरमित चौधरी, हीना खान-रॉकी जैस्वाल, रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला, अविका गोर-मिलिंद चंदवानी, स्वरा भास्कर-फहाद अहमद या कलाकारांच्या जोड्या पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, सोनाली बेंद्रेबरोबरच या कार्यक्रमात मुनव्वर फारुकीदेखील या शोचा सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे.