Star Pravah Changes Kajalmaya Serial Time : ‘स्टार प्रवाह’वर या महिन्यात एक हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर प्रमुख भूमिका साकारणार असून त्याच्यासह या मालिकेत ‘देवमाणूस २’ फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि नवोदित अभिनेत्री रुची जाईल प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या हॉरर मालिकेचं नाव आहे ‘काजळमाया’.
‘काजळमाया’ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये मालिकेच्या प्रसारणाची तारीख अन् वेळ जाहीर करण्यात आली होती. यानुसार ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित होणार होती. मात्र, ही वेळ आता बदलण्यात आली आहे.
‘काजळमाया’ ही हॉरर व रहस्यमय मालिका येत्या २७ ऑक्टोबरपासून रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे.
सध्या या साडेदहाच्या वेळेला स्टार प्रवाहवर ‘तू ही रे माझा मितवा’ ही अर्णव-ईश्वरीच्या हटके लव्हस्टोरी असलेली मालिका प्रसारित केली जाते. साडेदहाच्या स्लॉटला या मालिकेला पहिल्या दिवसापासून चांगला टीआरपी मिळत आहे. त्यामुळे ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेचे चाहते या निर्णयामुळे नाराज झाले आहेत.
“तू ही रे माझा मितवा’ची वेळ का बदलली? टीआरपी सुद्धा चांगला आहे”, “प्लीज विनंती आहे मालिकेची वेळ बदलू नका”, “जर काजळमाया साडेदहा ठेवलात तर ‘तू ही रे माझा मितवा’ला प्राइम स्लॉट द्या” अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आता २७ ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर काय बदल होणार जर, ‘काजळमाया’ मालिका साडेदहाला प्रसारित होणार असेल तर अर्णव-ईश्वरीच्या मालिकेची नवीन वेळ काय असेल असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

दरम्यान, ‘काजळमाया’ या मालिकेत प्रेक्षकांना चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या ‘पर्णिका’ नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळेल. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. याच चेटकीणीची भूमिका मालिकेत रुची जाईल साकारणार आहे.