Star Pravah Lapandav Promo Rupali Bhosale Double Role : स्टार प्रवाह वाहिनीवर ‘लपंडाव’ ही नवीन मालिका १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते. दुपारी प्रक्षेपित होऊन सुद्धा सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

‘लपंडाव’ या मालिकेत आई-मुलीचं नातं फारच वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. रुपाली भोसले म्हणजेच सरकार आणि सखी यांच्यात काहीच प्रेम नसतं. सरकार सतत सखीच्या मनाविरुद्ध वागत असते. कोणती खरी आई आपल्या लेकीशी अशा पद्धतीने वागेल अशा बऱ्याच प्रतिक्रिया या मालिकेसंदर्भात येत होत्या. मात्र, हाच ‘लपंडाव’चा सर्वात मोठा ट्विस्ट आहे.

सखीबरोबर राहणारी सरकार ही तिची खरी आई नाहीच आहे. आता लवकरच या मालिकेत सखी आणि कान्हाचा साखरपुडा होणार आहे. मात्र, यावेळी सुद्धा या दोघींमध्ये प्रचंड वाद होतात. सखी रडत-रडत साईबाबांच्या मंदिरात जाते आणि आपली आई आपल्याशी असं का वागतेय, याविषयी खंत व्यक्त करते…. सखी ढसाढसा रडत असते. इतक्यात काही गुंड एका महिलेला गुपचूप पकडून घेऊन जात असल्याचं कान्हा पाहतो. तो त्या महिलेला वाचवण्यासाठी पुढे जातो पण, इतक्यात एक गाडी येते आणि या महिलेला आतमधून कोणीतरी खेचून घेतं.

आता ही महिला कोण आहे असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. पण, ती दुसरी-तिसरी कोणी नसून सखीची खरी आई तेजस्विनी असते. तर, सध्या सरकारच्या रुपात जी सखीबरोबर राहतेय ती मनस्विनी असते. अर्थात, सखीच्या खऱ्या आईला ओलीस ठेवून सरकारने खूप मोठा डाव साधलेला असतो.

सखीची भेटही घेता येत नाही या विचाराने तिच्या खऱ्या आईचे डोळे पाणवतात. तर, दुसरीकडे मनस्विनी म्हणजेच सरकार तेजस्विनीची हतबलता पाहून भलतीच खूश होते.

रुपाली भोसले आता या मालिकेत दुहेरी भूमिका म्हणजेच डबल रोल साकारताना दिसेल. सखीची खरी आई सरकार नाहीये…तसेच तिचं नाव तेजस्विनी सुद्धा नाहीये. हा खरतनाक प्रोमो पाहून प्रेक्षकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आहे. “मस्त ट्विस्ट आहे हा”, “याला म्हणतात प्रोमो…काय खतरनाक प्रोमो आहे”, “तरी म्हणायचो कोणती आई अशी वागेल…हटके ट्विस्ट”, “ही मालिका आता प्राइम स्लॉट डिझर्व्ह करते” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

आता सखीला तिची खरी आई…खरी तेजस्विनी कधी भेटणार? तेजस्विनी व मनस्विनी या जुळ्या बहिणी असतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी भागात मिळाली.

दरम्यान, ‘लपंडाव’ मालिकेचा हा विशेष भाग ११ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केला जाईल.