Star Pravah New Serial Kajalmaya Telecast Date & Time : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच ‘काजळमाया’ या हॉरर मालिकेची घोषणा केली होती. यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं पहिल्याच प्रोमोमधून स्पष्ट झालं होतं. मात्र, ‘काजळमाया’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून कोण झळकणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोतून नायिका म्हणून कोण झळकणार याबद्दलचा खुलासा झालेला आहे.

‘काजळमाया’ या मालिकेत प्रेक्षकांना चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या ‘पर्णिका’ नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळेल. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. याच चेटकीणीची भूमिका मालिकेत रुची जाईल साकारणार आहे. ‘काजळमाया’च्या निमित्ताने रुची मालिकाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

अक्षय केळकर, रुची जाईल यांच्यासह या मालिकेत आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे तिचं नाव आहे वैष्णवी कल्याणकर. ‘देवमाणूस’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली वैष्णवी आता ‘काजळमाया’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेच्या प्रोमोमध्ये आरुषला ( अक्षय केळकर ) एका मुलीचा भास होत असल्याचं पाहायला मिळतं, ती मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून पर्णिका चेटकीण असते. मात्र, दरवेळेला वैष्णवी त्याला या कठीण प्रसंगातून बाहेर काढत असल्याचं या प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे.

‘काजळमाया’ मालिका केव्हा सुरू होणार? कोणती मालिका निरोप घेण्याची शक्यता?

‘काजळमाया’ ही हॉरर व रहस्यमय मालिका येत्या २७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका रात्री उशिराच्या स्लॉटला म्हणजेच ११ वाजता प्रसारित केली जाईल. सध्या या स्लॉटला ‘अबोली’ ही मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळे ‘काजळमाया’ सुरू होण्यापूर्वी ‘अबोली’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी सुद्धा ‘काजळमाया’च्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत कमेंट्समध्ये ‘अबोली’ मालिका आता संपेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आता या मालिकेला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.