Star Pravah Apurva Nemlekar Comeback : जवळपास दोन वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने यंदा जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेतील सगळीच पात्र घराघरांत लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने या मालिकेत खलनायिका सावनीची भूमिका साकारली होती. तिच्या दमदार अभिनयासाठी पुरस्कार सोहळ्यात देखील तिला सन्मानित करण्यात आलं होतं. ‘प्रेमाची गोष्ट’नंतर अपूर्वी टेलिव्हिजनवर कमबॅक केव्हा करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अभिनेत्रीने तिच्या कमबॅकची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत लवकरच अपूर्वाची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार आहे. ही मालिका नेमकी कोणती आहे? जाणून घेऊयात…
अपूर्वा नेमळेकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत लवकरच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत सात वर्षांचा लीप येणार असून नवं पात्र म्हणजेच एसीपी अपूर्वा पुरोहितची एन्ट्री होणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘शुभविवाह’ मालिकेत एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार असून पहिल्यांदाच ती पोलीस अधिकारी भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अपूर्वा म्हणाली, “स्टार प्रवाहबरोबर जिव्हाळ्याचं नातं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मी साकारलेल्या सावनी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. काही दिवसांपूर्वीच मी एका मुलाखतीमध्ये मला पोलीस अधिकारी साकारायला आवडेल असं म्हटलं होतं. माझी इच्छा या भूमिकेच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत मी एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच अशा धडाकेबाज रुपात झळकण्याची संधी मिळालीये. नवं पात्र साकारताना मी नेहमीच उत्सुकता असते. ‘शुभविवाह’ मालिकेमधली भूमी म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडेसह मी १३ वर्षांनंतर पुन्हा काम करणार आहे. यापूर्वी ‘आराधना’ मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. मधुरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे काम करताना धमाल येईल”
दरम्यान, मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सर्वांनी अपूर्वाच्या डॅशिंग लूकचं कमेंट्समध्ये भरभरून कौतुक केलं आहे. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारी अडीच वाजता प्रसारित केली जाते.