Suraj Chavan Wife Sanjana : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वीच तो लग्न करणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. आता सूरजची बायको नेमकी कोण आहे? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. लवकरच सूरज बायकोचा चेहरा सर्वांसमोर रिव्हिल करेल असं अंकिताने मध्यंतरी त्याच्या गावी भेट दिल्यावर सांगितलं होतं. तेव्हापासून चाहते सूरज बायकोसह फोटो केव्हा शेअर करणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा आज संपली असून ‘कोकण हार्टेड गर्ल’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरजच्या होणाऱ्या बायकोची झलक पाहायला मिळत आहे.

सूरज चव्हाणच्या बायकोचं नाव आहे संजना. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने नुकतंच या दोघांचं केळवण केलं. यावेळी सूरजने होणाऱ्या बायकोसाठी खास उखाणा घेतला. यावेळी तिचं नाव संजना असल्याचं सर्वांसमोर स्पष्ट झालं. सूरज म्हणतो, “बिग बॉस’ जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न…संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न!”

यानंतर सूरजच्या होणाऱ्या पत्नीने सुद्धा त्याच्यासाठी खास उखाणा घेतला आहे. संजना म्हणते, “बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको…सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!”

अंकिताने या दोघांच्या केळवणासाठी जय्यत तयारी केली होती. फुलांची सजावट तसेच सूरज व संजनासाठी खास पुरी-भाजीचा बेत केला होता. अंकिताने यावेळी सूरज अन् त्याच्या पत्नीचं औक्षण केलं. यानंतर दोघांनाही तिने खास भेटवस्तू दिल्या. या व्हिडीओला अंकिताने, “सूरज आणि संजना…सूरजचं केळवण.” असं कॅप्शन दिलं आहे.

suraj
सूरज चव्हाण व त्याची होणारी पत्नी संजना ( Suraj Chavan Wife )

नेटकऱ्यांनी या केळवणाच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आता चाहते अंकिताच्या व्हिडीओवर “सूरजचं लग्न कधी आहे” याबद्दल कमेंट्स करत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’पासून अंकिता व सूरज यांच्यात खूप छान बॉण्डिंग तयार झालं होतं. शोमध्ये अंकिताने सूरजला आपला भाऊ मानलं होतं. हे भावा-बहिणीचं नातं या दोघांनी शो संपल्यावर सुद्धा कायम जपलं आहे.