Prajakta Gaikwad Birthday : प्राजक्ता गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिनं अनेक मालिकांमध्ये काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ता ‘झी मराठी’वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. सध्या अभिनेत्री चर्चेत आहे ते तिच्या लग्नाच्या बातमीमुळे. अलीकडेच तिने लग्नपत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अशातच आता तिच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या नवऱ्यानं तिला खास शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.
प्राजक्ताने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेमुळे तिनं अनेकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. त्यामुळे तिचा खूप मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि त्यामार्फत ती तिच्या आयुष्यातील घडामोडींबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. अशातच आता तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे फोटो शेअर करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता गायकवाडला वाढदिवसानिमित्त होणाऱ्या नवऱ्याने दिल्या शुभेच्छा
प्राजक्ताला तिच्या चाहत्यांबरोबर तिचा होणारा नवरा शंभुराज खुटवड यानंदेखील इन्स्टाग्राममार्फत तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. शंभुराजनं प्राजक्ताचा फोटो शेअर करीत “माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू खूप खंबीर आणि चांगली आहेस. तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आहे,” असं लिहिलं आहे. प्राजक्ता गायकवाडनं त्यावर धन्यवाद असं लिहिलेलं दिसतं. प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी फटाके वाजवीत जल्लोष साजरा केल्याचं तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं.
प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात शंभुराजबरोबर साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करीत तिनं ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर केली होती. प्राजक्ता व शंभुराज यांची प्रेमकहाणीसुद्धा खूप खास असल्याचं तिनं दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. अशातच आता अभिनेत्री लवकरच शंभुराजबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

प्राजक्तानं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून ती २ डिसेंबर रोजी शंभुराजबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचं पाहायला मिळतं.