Swarajyarakshak Sambhaji will be re released: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट, मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. झी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.
२०१७ साली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रदर्शित झाली होती. जवळजवळ ३ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. २०२० साली स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, या मालिकेची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर आहे.
‘स्वराजरक्षक संभाजी’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार काम करताना दिसले होते. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज ही भूमिका साकारली होती. शंतनू मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.
अमित बेहल यांनी औरंगजेब ही भूमिका साकारली होती. प्राजक्ता गायकवाडने येसुबाई ही भूमिका साकारली होती. प्रतीक्षा लोणकर यांनी राजमाता जिजाऊ ही भूमिका साकारली होती. प्रिया मराठेने गोदावरी ही भूमिका साकारली होती. पूर्वा गोखलेने सईबाई ही भूमिका साकारली होती. आनंद काळे यांनी कोंडाजी बाबा ही भूमिका साकारली होती. स्वप्नील राजशेखर, श्रावणी पिल्लई, सुमित पुसावळे हे आणि इतर अनेक कलाकार या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत होते.
आता या मालिकेची चर्चा होण्याचे कारण म्हणजे ही मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. कधी व कुठे हे जाणून घेऊयात…
स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका झी टॉकीज या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. २७ ऑक्टोबरपासून ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सोमवार ते शनिवारी पाहता येणार आहे. रात्री आठ वाजता स्वराज्यरक्षक संभाजी मालिका प्रदर्शित होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता ही मालिका पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या मालिकेतून अनेक कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लवकरच प्राजक्ता लग्नबंधनात अडकणार आहे.