Tharala Tar Mag Actress Jui Gadkari Education : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून देखील तिला ओळखलं जातं. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका जुईसाठी गेमचेंजर ठरली. यामध्ये तिने साकारलेल्या ‘कल्याणी’ या पात्राला घराघरांत खूप प्रेम मिळालं. सध्या जुई सायलीच्या रुपात प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे.

मात्र, तुम्हाला माहितीये का? खऱ्या आयुष्यात जुई उच्चशिक्षित आहे आणि तिने आणखी एका विषयात मास्टर्स डिग्री संपादन करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. सध्या ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अभिनेत्री अभ्यास करताना दिसतेय. याची झलक जुईनेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

जुई आता Master In Entrepreneurship ( उद्योजकता ) या विषयात तिचं पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण करणार आहे. ‘नवीन सुरुवात’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. याशिवाय जुईने या पोस्टमध्ये ‘स्टुडंट्स लाइफ’ असा हॅशटॅग देखील वापरला आहे. जुई सेटवर बसून तिच्या असाइनमेंट लिहित असल्याचं या पोस्टमध्ये दिसतंय. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून जुई ‘उद्योजकता’ या विषयातील मास्टर्स डिग्री पूर्ण करणार आहे.

जुई गडकरीच्या शिक्षणाबद्दल…

जुई गडकरीने आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM Advertising मध्ये पूर्ण केलं आहे. यावेळी तिला मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालं होतं. यानंतर जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR या विषयात संपादन केली. याशिवाय जुईने तिचा डिप्लोमा डिजिटल मार्केटिंग विषयात पूर्ण केला आहे. आता अभिनेत्री पुन्हा एकदा नवीन सुरुवात करत Master In Entrepreneurship हा कोर्स पूर्ण करणार आहे.

jui
जुई गडकरी मिळवणार मास्टर्स डिग्री, सेटवर करतेय अभ्यास

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शूटिंग अनेकदा १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. त्यामुळे जुई अभ्यास आणि शूटिंग या दोन्ही गोष्टी कशा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जुईने अभ्यास करतानाची स्टोरी शेअर केल्यावर चाहत्यांनी तिला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.