Tharala Tar Mag Purna Aaji Comeback : ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते… तो क्षण अखेर मालिकेत आलेला आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये नव्या पूर्णा आजीची एन्ट्री झालेली आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वत्र चर्चा चालू होती. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोतून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रियाचे खरे आई-बाबा सुभेदारांच्या घरी आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मिस्टर अँड मिसेस लोखंडे आपले आई-बाबा असल्याचं सत्य प्रियाला माहिती असतं. मात्र, अन्य कुटुंबीय हे सायलीचे खरे पालक आहेत असं समजत असतात.
आपली खरी ओळख तन्वी किल्लेदार नसून बबली आहे हे भांडं सर्वांसमोर फुटेल या भीतीने प्रिया आता लोखंडेंना घराच्या बाहेर काढणार आहे. “पैशांसाठी नाटकं सुरू आहेत यांची…जशी मुलगी तसेच हिचे आईबाप सुद्धा ढोंगी आहेत” असं म्हणत प्रिया लोखंडेंचा अपमान करते. त्यांना धक्के मारून घराच्या बाहेर काढते.
मिसेस लोखंडे प्रियाचा धक्का लागून खाली पडतात इतक्यात त्यांना एक खास व्यक्ती सावरते ती म्हणजे सर्वांची लाडकी पूर्णा आजी. आजी सर्वांसमोर प्रियाला चांगलाच धडा शिकवते. तिला सणसणीत कानाखाली वाजवते. पुढे, प्रियाला ठणकावून सांगते, “हे सुभेदारांचं घर आहे…इथे मोठ्यांचे पाय धरले जातात…मोडले जात नाहीत. पुन्हा असं वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सुना मिळून तुला घराबाहेर काढू”
पूर्णा आजी सुभेदारांच्या घरात दिवाळीमध्ये एन्ट्री घेणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केला जाईल. आता पूर्णा आजीच्या एन्ट्रीनंतर मालिका कोणतं वळण घेणार? मधुभाऊ शुद्धीवर येतील का? प्रियाचं सत्य केव्हा बाहेर येईल? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.