Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच प्रियाच्या खऱ्या आई-बाबांची एन्ट्री झाली. ‘मिस्टर अँड मिसेस लोखंडे’ या दोघांनाही अर्जुन सुभेदारांच्या घरी घेऊन येतो. मात्र, प्रिया खोटेपणाने तन्वी किल्लेदार म्हणून वावरत असल्याने ‘मिस्टर अँड मिसेस लोखंडे’ सायलीचे आई-बाबा आहेत असा समज अर्जुनचा होतो. हळुहळू सायली अन् तिच्या आई-बाबांमध्ये काहीच साम्य नाहीये. त्यांचे स्वभावही प्रचंड वेगळे आहेत याची जाणीव अर्जुनला होते. यामुळे तो सायली अन् मैनावतीची DNA टेस्ट करतो पण, यातही प्रिया अदलाबदल करते त्यामुळे रिपोर्ट्स खोटे येतात.
दुसरीकडे, सायलीला सुद्धा मैनावती व सदाशिव हे दोघं आपले आई-बाबा नाहीयेत, याबद्दल शंका येऊ लागते. ती दोघांनाही आपल्या बालपणाबद्दल अनेक प्रश्न विचारते…आणि त्यांच्या उत्तरात तिला प्रचंड तफावत जाणवते. परिणामी, DNA रिपोर्ट्स मॅच झाले असले तरीही माझं मन मला सांगतंय की हे माझे आई-बाबा नाहीचेत असं सायली ठामपणे अर्जुनला सांगते. आता मैनावतीचा आणखी एक खोटेपणा सायलीसमोर उघड होणार आहे. ती, मावशीचा पत्ता, नाव या सगळ्या गोष्टी सायलीला चुकीच्या सांगते.
मैनावती आपली आई नाहीये याचा अंदाज आता सायलीला हळुहळू येऊ लागला आहे. अशातच आता सुभेदारांच्या घरी प्रियाचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. खरंतर हाच तन्वीचा वाढदिवस असतो. त्यामुळे केक कापल्यावर प्रतिमा लेकीला केक भरवायला पुढे होते. पण, तिची पावलं आपोआप सायलीकडे वळतात. प्रियाकडे पाठ फिरवून प्रतिमा सायलीला केक भरवते. हे पाहून सायलीचे डोळे पाणावतात आणि आईचा हात धरून ती रविराज किल्लेदारांपर्यंत पोहोचते. या मायलेकी मिळून रविराजला केक भरवतात.
इतक्यात, प्रतिमा रविराजला म्हणते, तन्वी सुद्धा बालपणी अशाचप्रकारे माझा हात धरायची आणि आम्ही दोघी मिळून तुम्हाला केक भरवायचो. हे ऐकून रविराजचे डोळे पाणावतात. सायलीला तिचा भूतकाळ यावेळी पुसटपणे आठवू लागतो. हे सगळं जसच्या तसं मी आधीही जगलेय याची जाणीव तिला होते. त्यामुळे सायली दोन्ही हात कानावर ठेऊन सगळं आठवण्याचा प्रयत्न करते.
प्रतिमा-रविराज आणि सायलीला पाहून जवळच उभा असलेला अर्जुन थक्क होतो. या तिघांमधलं भावनिक नातं पाहून सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात. आता या प्रसंगानंतर अर्जुनला सायलीच्या भूतकाळाविषयी मोठी हिंट मिळेल का? प्रिया या सगळ्या घडामोडीनंतर काय प्रतिक्रिया देणार? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ९ आणि १० नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी या भावनिक प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत सायलीला भूतकाळ लवकरात लवकर आठवूदेत असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
