Ali Asgar On Performing Female Roles: ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमांतून अनेक कलाकार आज घराघरांत पोहोचले आहेत. त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेता अली असगरलादेखील या शोमधून मोठी लोकप्रियता मिळाली.

कॉमेडी शोमध्ये अभिनेत्याने विविध भूमिका साकारताना स्त्रीपात्रेदेखील साकारली. तो या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. मात्र, त्याच्या कामाचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला. आता एका मुलाखतीत अभिनेत्याने यावर वक्तव्य केले आहे. सतत स्त्रीपात्रे साकारणे त्याला आवडत नव्हते, असा खुलासा त्याने केला.

त्याचा मला त्रास होऊ लागला…

अभिनेता म्हणाला, ” ‘द कपिल शर्मा शो’च्या आधी आम्ही ‘कॉमेडी सर्कस’ हा शो केला होता. अर्चना पूरन सिंग व दलेर मेहंदी हे या शोचे जज होते. त्या शोमधून मी खूप गोष्टी शिकलो. त्यावेळी मी कपिलबरोबर पहिल्यांदा काम केले. पण, मी त्यानंतर मी ‘कॉमेडी सर्कस’मध्ये काम केले नाही. कारण- २६ एपिसोडमधील १८-१९ एपिसोडमध्ये मला स्त्री पात्राची भूमिका साकारावी लागली होती.

असा एक काळ होता जेव्हा लेखक माझ्यासाठी स्त्री पात्रे लिहीत असत. अगदी पुरस्कार सोहळ्यांमध्येदेखील अली स्त्री पात्रे साकारेल, असे त्यांनी गृहीत धरले होते. त्यामुळे आठवड्यातील सात दिवसांपैकी चार दिवस स्त्री वेशात असे. त्याचा मला त्रास होऊ लागला. मला काम मिळत होते, यात काही शंकाच नाही. मला त्याचे मानधनदेखील चांगले मिळत होते. पण, मला त्यामध्ये समाधान मिळत नव्हते. त्यामुळे मी जाणीवपूर्वक कामातून ब्रेक घेतला. मी नऊ महिने घरी बसलेलो होतो.”

“‘जीनी और जूजू’ची सुरुवात चांगली झाली. त्यानंतर कपिल शर्माने मला कॉमेडी नाईट्स विथ कपिलची ऑफर दिली. कपिलच्या आजीची भूमिका करण्यासाठी त्यांनी मला ऑफर दिली. मी त्यासाठी नकार दिला. पण, त्यांनी माझी मनधरणी केली. त्यांनी मला सांगितले की, आधीच स्क्रिप्ट लिहिली गेली आहे. चार-पाच भाग ही भूमिका करावी लागेल. त्यानंतर आपण स्क्रिप्ट बदलू. पुढे माझी भूमिका बदलली जाईल, या उद्देशाने मी काम सुरू केले.”

‘द कपिल शर्मा शो’ का सोडला यावर अली असगर म्हणाला, “माझ्या पात्राला पहिल्यासारखा प्रतिसाद मिळत नव्हता. मी जसे ते साकारले होते, त्यानंतर ते करण्यात मला मजा येत नव्हती. मी जे तयार केले होते, ते नष्ट करण्यापेक्षा ते सोडलेले बरे, असे मला वाटले. त्यामुळे मी शो सोडण्याचा निर्णय घेतला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्त्री पात्र साकारण्याचा वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला, यावर बोलताना अली असगर म्हणाला, “कॉमेडी सर्कसच्या वेळी मी स्त्री पात्रे साकारली होती. त्यावेळी मुलांना शाळेत त्रास दिला जात असे. इतर मुले त्यांची खिल्ली उडवत असत. त्यावेळी माझ्या मुलाने मला म्हटले होते की, तुम्हाला इतर काही येत नाही का? त्यावेळी मला धक्का बसला होता. त्यावेळी मी कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मी स्त्री पात्रे साकारण्यास नकार दिला. मी नऊ महिने घरी राहिलो. पण, देव दयाळू आहे. मला ‘जीनी और जूजू’ या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली”, असे म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.