Manasi Kulkarni reveals Why was she away from television for 10 years: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने गायत्री ही भूमिका साकारली आहे. खलनायिकेच्या भूमिकेतूनही अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
या मालिकेआधीही अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. ‘कुंकू’ या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याबरोबरच ‘१७६० सासूबाई’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘बंधन’ अशा चित्रपट व मालिकांमध्ये तिने काम करत तिची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं‘ या मालिकेआधी ती १० वर्षे मालिकाविश्वापासून दूर होती.
मानसी कुलकर्णी काय म्हणाली?
आता अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती अभिनय क्षेत्रापासून का दूर होती याबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने नुकताच राजश्री मराठीशी संवाद साधला. मानसी म्हणाली, “ठरवून असा ब्रेक घेतला नव्हता. पण, मी गरोदर होते, तिथून सुरूवात झाली. त्यातही मी चार-पाच महिने ‘छडा’ या नाटकात काम करत होते. त्याचे प्रयोग करत होते. त्यानंतर मी ब्रेक घेतला. बाळ झाल्यानंतर काही वेळ मुलासाठी द्यायला पाहिजे, असं वाटतं. मी दीड वर्ष त्याच्यासाठी दिलं. त्यानंतर मी विचार केला की, मी हळूहळू काम करेन. मात्र, लगेच मला टेलिव्हिजनमध्ये काम करायचं नव्हतं. कारण- टीव्हीसाठी खूप वेळ द्यावा लागतो.”
“मूल लहान असताना इतका वेळ कामासाठी देणं मला गरजेचं वाटलं नाही. तेव्हा मग मी जाहिरात, चित्रपटात काम केलं. कारण- त्यामध्ये माहीत असतं की, ५-१० दिवसांनंतर मी घरी येणार आहे. टीव्हीमध्ये महिनोन महिने, वर्षानुवर्षे काम सुरूच असतं. त्यामुळे त्यावेळी मी मालिकांत काम करणं टाळलं.”
“त्यानंतर माझ्या खासगी आयुष्यात खूप गोष्टी घडल्या. त्या खूप अनपेक्षित आणि दुर्दैवी होत्या. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यात थोडा वेळ गेला. त्यानंतर कोविड लागला. त्यात दोन वर्षं गेली. अशा पद्धतीनं तो गॅप खूप मोठा म्हणजे १० वर्षांचा झाला. त्यानंतर मी स्वत:ला तयार केलं की, आता आपण कामासाठी सुरुवात करूयात. पण, खूप मोठा गॅप असल्यानं कोणतंही, येईल ते काम करूया, असा विचार मी केला नाही. मी माझा प्राधान्यक्रम ठरवला होता. मला बाहेरगावी जाऊन खूप दिवस असलेलं काम नको होतं. कोविडनंतर मालिकेचं शूटिंग बाहेरगावी सुरू होतं. त्यामुळे फक्त ८-१० दिवसच काम असेल; पण तिकडेच जाऊन राहावं लागणार, असं असेल, तर मला तशाही प्रकारचं काम नको होतं.”
“‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतील भूमिकेसाठी मला विचारलं होतं. त्यावेळी मी त्यांना विचारलेलं की, शूटिंग कुठे आहे? तर त्यांनी मुंबई, असं सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे भूमिकादेखील चांगली होती. मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या, त्या या मालिकेतून पूर्ण झाल्या आणि मी परत टेलिव्हिजनवर आले”, असे म्हणत अभिनेत्रीने ती १० वर्षे मालिकाविश्वापासून का दूर होती, याचे कारण सांगितले.