अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. तो त्याचे चित्रपट, सोशल मीडियावर शेअर केलेल्या रील्स यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. मात्र, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचे सूत्रसंचालन तो करणार आहे, अशी घोषणा जेव्हा करण्यात आली, तेव्हापासून हा अभिनेता मोठ्या चर्चेत आहे.

बिग बॉस मराठीच्या मागील चार पर्वांचे सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार, यामुळे चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

आता भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची कधी शाळा घेत, कधी त्यांना समजावत, शाबासकीची थाप देत आपल्या वेगळ्या स्टाईलने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड व प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी रितेश देशमुखबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले केदार शिंदे?

केदार शिंदे यांनी अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी रितेश देशमुखबद्दल बोलताना म्हटले, “रितेश हे खूप चांगले व्यक्ती आहेत. माझी त्यांच्याबरोबर ओळख होती. ओळख असणं ही वेगळी गोष्ट; पण पहिल्यापासूनच मी त्यांचा आदर करतो. कारण- आपल्या इंडस्ट्रीमधील ते एक शांत व्यक्ती आहेत. ते कुठल्याही राजकारणात नाहीच, त्यांचं कुठलाही कॅम्प नाही. ते खूप कौटुंबिक आहेत. त्यांच्या रील बघताना जेनेलिया वहिनी आणि ते ज्या पद्धतीने करतात, त्यातून जाणवतं की, त्यांच्या कुटुंबात किती बॉण्डिंग आहे.”

“मी ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो तेव्हा मला समजलं की, ते बिग बॉसचे किती मोठे चाहते आहेत. हिंदीतले सगळे सीझन त्यांनी बघितलेत. त्यांना प्रत्येक गोष्ट माहितेय की, कधी काय झालं होतं. आजही मी जेव्हा त्यांना बघतो, तेव्हा ते शोबरोबर जोडलेले असल्याचे जाणवते. फक्त भाऊचा धक्काच नाही, तर रोज जे जे घडतं, त्याबद्दल ज्यावेळी त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते बोलतात. त्यांच्याकडे कुठलाही अभिनिवेश नाही.”

“… बऱ्याच वेळा मला विलासराव देशमुख दिसले”

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “बऱ्याच वेळा रितेशभाऊ बोलतात आणि मी एडिट बघतो ना, त्यावेळी त्यांची एक बोलण्याची पद्धत आहे. चित्रपटांत वगैरे मला कधी जाणवत नाही. रितेशभाऊ स्पर्धकांना समजावत असतात, ते पाहिल्यानंतर मला विलासरावांची आठवण येते. पहिला एपिसोड जेव्हा मी एडिट करीत होतो तेव्हा लगेच संध्याकाळी मी रितेशभाऊंना सांगितलं होतं की, आजचा एपिसोड बघा, तुम्हाला आवडेल. पण, मला असं वाटतं ना की, बऱ्याच वेळा मला विलासराव देशमुख दिसले. ते शेवटी वडील आहेत.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर निक्कीच्या अकाउंटवरून पहिली पोस्ट, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच अरबाज पटेल कमी मते मिळाल्यामुळे बाहेर पडला आहे. त्याबरोबरच हा सीझन ७० दिवसांतच निरोप घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता बिग बॉसच्या घरात आणखी काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.